नववर्षाला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. नव्या वर्षात नवी ध्येयंही असणं आवश्यक आहे. परंतु यादरम्यान आपल्या आर्थिक चुकांवरही लक्ष दिलं पाहिजे. अशा चुका अनावधानानंही आपण अनेकदा करतो. २०२३ हे वर्ष सुरू होणार आहे. यासाठीच आता फायनॅन्शिअल रिझॉल्युशन करणंही तितकंच आवश्यक आहे. नव्या वर्षात गुंतवणूक करण्यापूर्वी या चुका सुधारल्या पाहिजेत.
गुंतवणूकीचं कारण
बरेचदा असे दिसून येते की बहुतेक लोक फक्त टॅक्स वाचवायचा आहे किंवा अधिक रिटर्न मिळवायचे आहेत म्हणून गुंतवणूक करतात. पण, ही चूक करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक का करत आहात हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमचे ध्येय ठरवा.
क्रेडिट रिपोर्ट न पाहणं
बहुतेक लोक ही चूक करतात की ते त्यांचा क्रेडिट स्कोर तपासतच नाहीत. यात त्या लोकांचादेखील समावेश आहे, ज्यांना याबाबत माहिती आहे, परंतु ते देखील ते फक्त कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना तो पाहतात. नवीन वर्षात ही सवय बदला. तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा. यावरून तुमचा क्रेडिट स्कोअर किती सुधारला आहे किंवा तो कमी का आहे हे दिसून येते.
क्रेडिट कार्ड आणि ईएमआय डिफॉल्ट
जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा EMI चुकवला तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होते. भविष्यात तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात स्वत:लाच वचन द्या की तुम्ही तुमचे पेमेंट वेळेवर कराल.
अधिक क्रेडिट कार्ड्स ठेवणं
गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणे जड जाऊ शकते. अधिक क्रेडिट कार्ड्स घेऊन लोक ही चूक करतात. म्हणूनच नवीन वर्षात ही चूक सुधारायला हवी. आपल्याला आवश्यक तेवढीच क्रेडिट कार्ड ठेवा. कारण यामुळे परतफेडीसाठी तुमच्यावर दबाव येणार नाही. अधिक क्रेडिट कार्ड मॅनेज करणं कदाचित तुमच्यासाठी कठीणही होऊन जाईल. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही नकारात्मक परिणाम होतो. तसेच थोड्या थोड्या अंतराने क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे टाळा.
कर्ज, बचत आणि गुंतवणूकीतील ताळमेळ
ज्या प्रकारे प्राधान्य असेल त्याच प्रमाणे देणी द्या. तुमच्या पगारातून कर्ज फेडण्यासोबतच बचतीचा भागही बाजूला काढून घ्या. जर तुमच्याकडे तितका फंड असेल ज्याच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकत असाल तर ती करा. वेळेत कर्ज फेडणं तितकंच आवश्यक आहे, जितकं भविष्यासाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे.