Join us  

वर्षाचा शेवट झाला निर्देशांकाच्या वाढीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2017 12:52 AM

सप्ताहाची सुरुवात जरी घसरणीने झाली असली तरी सन २०१६चा शेवट मात्र आशादायक वातावरणाने झाला आहे. शुक्रवारी बाजाराच्या निर्देशांकांनी वाढ दर्शवित वर्षाला निरोप दिला.

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीसप्ताहाची सुरुवात जरी घसरणीने झाली असली तरी सन २०१६चा शेवट मात्र आशादायक वातावरणाने झाला आहे. शुक्रवारी बाजाराच्या निर्देशांकांनी वाढ दर्शवित वर्षाला निरोप दिला. या सप्ताहात जवळपास सर्वच निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. वर्षभरात संवेदनशील निर्देशांकाने १.९४ टक्के वाढ दिली.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह बऱ्याच घडामोडींचा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडवल बाजारावर अधिक प्रमाणात कर आकारणी करण्याचे केलेले सूतोवाच बाजारात घबराट निर्माण करून गेले. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेल्या आश्वासनाने बाजाराला काहीसा दिलासा मिळाला. गुरुवारी सौदापूर्तीच्या व्यवहारांमध्येही वाढ झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५८५.७६ अंशांनी म्हणजेच २.२४ टक्के वाढून २६६२६.४६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २.५० टक्के म्हणजेच २००.०५ अंशांनी वाढून ८१८५.८० अंशांवर बंद झाला. सौदापूर्तीच्या वेळी बाजारात आलेली तेजी त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेल्या रुपयामुळेही बाजारात तेजी संचारली. अर्थमंत्र्यांचे आश्वासन बाजाराचे मनोधैर्य वाढविण्यात कामी आले आणि बाजारातील अनिश्चितता कमी झाली.भांडवलबाजाराच्या संदर्भात संपूर्ण वर्षाचा विचार करता संवेदनशील निर्देशांक ५९८.९२ अंश म्हणजेच १.९४ टक्के वाढलेला दिसून आला. या वर्षभरामध्ये निर्देशांकाने २९०७७ आणि २२४९४ यादरम्यान आंदोलने घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वर्षभरामध्ये २३९.४५ अंश म्हणजेच ३.०१ टक्क्यांनी वाढला आहे.