नवी दिल्ली : देशातील हस्तकौशल्याच्या वस्तूंच्या उद्योगात येत्या काही वर्षांत मोठी वाढ अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षात साधारणपणे दुप्पट म्हणजे १७ हजार कोटी रुपयांची निर्यात होण्याची शक्यता ‘द असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया’ने (असोचेम) वर्तविली आहे. हस्तकला उद्योगामुळे एकीकडे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असताना देशातील एकूण निर्यातीमधील या क्षेत्राचा हिस्सा मात्र घटला आहे. हस्तकौशल्य वस्तूंच्या उद्योगात सातत्याने वाढ नोंदली जात असून २०२०-२१ मध्ये निर्यात २४ हजार कोटींवर जाईल, असे ‘असोचेम’च्या अहवालात म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांत हस्तकलेच्या वस्तूंना मागणी वाढत असल्याने या क्षेत्रात आगामी काळात आशादायी चित्र दिसणार आहे. २०१४-१५ मध्ये भारतातून ९ हजार कोटी रुपयांच्या हस्तकलेच्या वस्तूंची निर्यात झाली. वर्षअखेर हस्तशिल्पांच्या निर्यातीचा आकडा १७ हजार कोटींवर जाईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २००१-०२ ते २०११-१२ च्या दरम्यान या क्षेत्राची सरासरी ५.३ टक्के दराने वाढ झाली. कल्पकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात भारतीय हस्तकला उद्योग मात्र अपेक्षित प्रगती करत नसून निर्यातीसंबंधित फारशी माहितीही या क्षेत्रातील लोकांना नसल्याचे याबाबत केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. हस्तकला कारागिरांना आवश्यक वित्त पुरवठाही होत नसल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीमधील हस्तकला वस्तूंच्या निर्यातीचा हिस्सा गेल्या वर्षात घसरला आहे, ही चिंतेची बाब आहे. २००१-०२ मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत ४ टक्के असलेले हस्तकला वस्तूंचे प्रमाण २०११-१२ मध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी झाले असल्याचे ‘असोचेम’चे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
यंदा १७ हजार कोटींची हस्तशिल्प निर्यात होणार
By admin | Published: July 10, 2015 1:14 AM