Join us

यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार !

By admin | Published: September 16, 2016 1:09 AM

लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाचा मार झेलल्यानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे देशात २०१६-१७ या चालू पीक वर्षात धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठण्याची आशा असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री

नवी दिल्ली : लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाचा मार झेलल्यानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे देशात २०१६-१७ या चालू पीक वर्षात धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठण्याची आशा असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी गुरुवारी स्पष्ट केले.२०१३-१४ (जुलै ते जून) या पीक वर्षात २६ कोटी ५०.४ लाख टन एवढे धान्याचे उत्पादन झाले, तो आजवरचा विक्रमी उच्चांक होता. दुष्काळामुळे २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांमध्ये उत्पादन घटून ते अनुक्रमे २५ कोटी २०.२ लाख टन आणि २५ कोटी ३२.३ लाख टनांवर आले होते. चांगल्या पावसामुळे सरकारने यावर्षी २७ कोटी १ लाख टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. धानाचे उत्पादन १० कोटी ८५ लाख टन, गहू ९ कोटी ६५ लाख टन तसेच डाळींचे उत्पादन २ कोटी ४५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. पिकांसाठी चांगला पाऊसरब्बी पिकांसंबंधी संमेलनाला संबोधित करताना राधामोहनसिंग म्हणाले की, एकूणच यावर्षीचा पाऊस शेतीसाठी अनुकूल आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाला असून त्याचे प्रमाणही संतुलित आहे. यावर्षी डाळींचे विक्रमी उत्पादन होण्याची आशा आहे कारण खरीप लागवडीचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढून १४३.९५ लाख हेक्टर झाले आहे. धान, तीळ आणि कडधान्याची लागवडही वाढली आहे. नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच खरीपाची पेरणी होत असून पुढील महिन्यात पीक येऊ लागते. आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात डाळींची लागवड वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. डाळींची किमान आधारभावानुसार खरेदीबऱ्याच डाळींचे उत्पादन रब्बी हंगामात होत असून त्यासाठी शेतकऱ्यांना कायम प्रोत्साहित करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना डाळींचा किमान आधारभाव (एमएसपी) न दिला गेल्यास लागवडीला प्रोत्साहन दिले जाऊ शकणार नाही. त्यामुळेच आम्ही किमान आधारभावानुसार डाळींची खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरकारी संस्थांनी मुगाची खरेदी सुरू केली आहे. आवक वाढल्यानंतर तूर आणि उडदासारख्या डाळींची खरेदीही वाढविली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)