Join us

गुंतवणुकीसाठी लाभदायक ठरणारे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 2:21 AM

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्राबल्य वाढले. यामुळेच गेल्या नऊ महिन्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा चांगली उसळी घेईल, असे आजवरच्या इतिहासावरून नक्की अंदाज व्यक्त करता येऊ शकतो

भारतीय अर्थव्यवस्थेचा आजवरचा इतिहास पहाता ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था संकटात किंवा अडचणीत येते तेव्हा तिने पुन्हा सकारात्मक उसळी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी त्याची ठळक उदाहरणे द्यायची असली तर १९९० मध्ये खुल्या  अर्थव्यवस्थेचा केलेला स्वीकार, इ.स. २००० मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांना लाभलेली गती, खासगीकरण, पायाभूत सुविधांमध्ये चांगली वाढ झाली. 

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे प्राबल्य वाढले. यामुळेच गेल्या नऊ महिन्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा चांगली उसळी घेईल, असे आजवरच्या इतिहासावरून नक्की अंदाज व्यक्त करता येऊ शकतो. शेअर बाजाराचे ढोबळ मानाने दोन प्रमुख भाग पडतात, ते म्हणजे प्रायमरी मार्केट व सेकंडरी मार्केट होय. प्रायमरी मार्केटबाबत बोलावयाचे झाले तर लाॅकडाऊनच्या पूर्वीच्या काळात नव्या समभाग विक्रीचे प्रस्ताव फारसे बाजारात येत नव्हते. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद लाभत नव्हता. मात्र गेल्या तीन-चार महिन्यात पुन्हा एकदा या भांडवली बाजाराला चांगला प्रतिसाद लाभत आहे. आगामी काही महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड‌्स, सीएएमएस (कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस), माझगाव डॉक व चेमकॉन केमिकल्स या कंपन्यांतर्फे खुली समभाग विक्री करण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने गुंतवणूकदार सध्या चांगला प्रतिसाद देत आहेत त्यावरून आगामी वर्षभरात प्राथमिक बाजारात सर्वसामान्य गुंतवणूकदारांना चांगली संधी प्राप्त होणार आहे. ज्या कंपन्यांचे सध्याचे बाजारमूल्य कमी आहे व ज्यांची नफा व एकूणच कार्यक्षमता चांगली आहे अशा  कंपन्यांमध्ये सध्याच्या काळात गुंतवणूक करणे नेहमी हिताचे ठरते. चांगल्या लाभांश देणाऱ्या,  अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर निश्चित लाभदायक ठरते. त्यादृष्टीने २०७७ हे संवत सध्या तरी जास्त आशादायक व गुंतवणूकदारांना लाभदायक ठरेल, अशी सध्याची स्थिती आहे. तरीही कोरोनाच्या आगामी काही महिन्यातील कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.  त्यापोटी लॉकडाऊनसारखे नवे संकट उभे ठाकले नाही व अर्थव्यवस्थेत हिरवे कोंब दिसण्यास प्रारंभ झाला आहे. त्यात सतत वाढ होत राहिली तर नवे संवत नक्कीच चांगले ठरेल यात शंका नाही.

या क्षेत्रांना चांगले दिवसn शेअर बाजाराचा किंवा सेकंडरी मार्केटचा विचार करता सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जी उत्पादन क्षेत्रे मोलाचा हातभार लावत आहेत त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्या; बँकिंग व वित्तसेवा कंपन्या, वाहन उद्योग, औषध उत्पादन कंपन्या, एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड‌्स कंपन्या) यांच्यामध्ये चांगली आर्थिक सुधारणा व कामगिरी हळूहळू चांगली होताना दिसत आहे. देशाच्या अर्थव्यवस्था रुळावर स्थिर येण्यासाठी निश्चितच वर्ष दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :मुंबईशेअर बाजारव्यवसाय