करनीती भाग २१३ - सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आज ख्रिसमस आहे. सगळीकडे आनंद पसरला आहे, तर तू याबद्दल काय सांगशील?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, ख्रिसमस हा संपूर्ण जगभरात साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी सांताक्लॉज लहान मुलांना भेटवस्तू देतो. ख्रिसमसला सांताक्लॉज लहान मुलांना चॉकलेट, खेळणी इत्यादी देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे, करदात्यांच्याही काही अपेक्षा आहेत, ज्या या नवीन वर्षात पूर्ण व्हायला पाहिजेत.अर्जुन : कृष्णा, करदात्यांच्या आयकर क्षेत्रात कोणकोणत्या अपेक्षा आहेत?कृष्ण : अर्जुना, करदात्यांना आयकरात पुढील बदल अपेक्षित आहेत. १) करपात्रतेसाठी उत्पन्नाची मर्यादा ही २.५ लाखांवरून वाढविण्यात यावी. २) एकूण उत्पन्नातून मिळणाºया वजावटींचीदेखील मर्यादा वाढवावी. जसे की, पगारदार वर्गाला मिळणारे मुलांच्या वर्गणी शुल्काची, त्याचप्रमाणे हॉस्टेलच्या शुल्काची वजावट, कलम ८० सीमधील १.५ लाखांची मर्यादा. ३) गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीवरील मर्यादा काढून टाकावी. ४) कॅश नोटीस सर्वांना पाठवू नये. ज्यांना लागू असेल, त्यांनाच पाठवाव्या. कारण यामुळे लहान करदात्यांना फार व्यथा येतात. त्यांनाही या सर्व नोटीसला प्रत्युत्तर द्यावे लागते. ५) मर्यादित छाननीमध्ये (लिमिटेड स्क्रुटिनी) ज्या मुद्द्याची छाननी करायची आहे, तेवढीच चौकशी करावी. इतर मुद्दे तपासू नयेत, तसेच २०१८ पासून आॅनलाइन निर्धारण करण्यात आले आहे. त्याचा सर्वांना फायदा व्हावा. अशी अपेक्षा आहे. ६) महिलांसाठीदेखील करपात्रेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी.अर्जुन : कृष्णा, करदात्यांच्या जशा आयकराबद्दल अपेक्षा आहेत, त्याचप्रमाणे जीएसटीबद्दलही असतीलच ?कृष्ण : होय अर्जुना, करदात्यांच्या जीएसटीमध्येही खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे.१) जीएसटीचे रिटर्न्स सोइस्कर आणि सुरळीत करावे. २) काही करदात्यांना जीएसटीच्या तरतुदी कठीण वाटत आहेत. जसे की, कापड व्यापाºयांवर अप्रत्यक्ष कराच्या तरतुदींचे पालन करणे हे कापड व्यापाºयांसाठी अवघड आहे. म्हणून या तरतुदी थोड्या सोप्या करण्यात याव्या. ३) निर्यातदारांसाठी परताव्याच्या तरतुदी आहेत. या तरतुदी कठीण नाहीत, परंतु सरकारकडून परतावा मिळवण्यासाठी खूप कालावधी लागतो. त्यामुळे निर्यातदारांच्या कार्यकारी भांडवलावर परिणाम होतो. म्हणून वेळेवर परतावा द्यावा. ४) कॉन्ट्रॅक्टरवर असलेले जीएसटीचे वेगवेगळे दर काढून एकच दर ठेवावाआणि कॉन्ट्रॅक्टरवरील जीएसटीच्या तरतुदी थोड्या सोप्या करण्यातयाव्या.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, नवीन वर्ष जेव्हा येते, तेव्हा ते सर्वांच्या अपेक्षा घेऊन येते. सर्व करदात्यांच्याही खूप अपेक्षा आहेत. ख्रिसमसला सांताक्लॉज आपल्या अपेक्षा पूर्ण करतो, परंतु करदात्यांसाठी कर अधिकारीच सांताक्लॉज आहे. फक्त तेच करदात्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात.
यंदाचा ख्रिसमस करदात्यांचा, अनेक अपेक्षांचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:50 AM