मुंबई - Yes Bank चे माजी सीईओ राणा कपूर यांच्या मुंबईतल्या वरळी स्थित(समुद्र महल) घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. तत्पूर्वी ईडीनं डीएचएफएलच्या कपिल धवन यांना मनी लाँड्रिंग प्रकरण आणि गॅगस्टर इक्बाल मिरचीशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली. आता, न्यायालयाने राणा कपूर यांना सक्तवसुली संचालनालय कोठडीत पाठवले आहे. याप्रकरणात आता भाजपाने काँग्रेसला खेचले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राणा कपूर यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
देशातील प्रत्येक आर्थिक घोटाळ्यात काँग्रेसचा सहभाग असल्याचा आरोप करत भाजपाने प्रियंका गांधींवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या पेटींग्ज खरेदीसाठी राणा कपूर यांनी 2 कोटी रुपये मोजल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाने राणा कपूर यांच्यासमवेत पी. चिदंबरम यांचा फोटो शेअर करुन काँग्रेला धारेवर धरले होते. युपीए सरकारच्या कार्यकाळात प्रियंका गांधी यांच्या पेंटीग्सला राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांत खरेदी केले होते, असे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे. सध्या, आयटी विभागाकडून याबाबत तपास सुरू आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे. मात्र, प्रियंका गांधी आणि राणा कपूर यांच्यात लिंक असल्याचे काँग्रेसला मान्य नाही.
पेटींग्स विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यातला हा आर्थिक व्यवहार आहे. याचा प्रियंका गांधींशी काहीही संबंध नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. जर नरेंद्र मोदींनी हे पेंटिंग खरेदी केलं असतं तर तुम्ही काय म्हणाला असता? हे सरकार प्रियांका गांधीच चालवतात, असे तुम्ही म्हटले असते का?, असे प्रश्न काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी उपस्थित केले.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आता येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून येस बँकेने ही माहिती दिली आहे.