Yes Bank Rana Kapoor : येस बँकेचे सहसंस्थापक (Yes Bank Co-Founder) राणा कपूर यांना ४०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मिळाला आहे. राणा कपूर यांना ७ मार्च २०२० रोजी सक्तवसूली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रथमच अटक केली होती आणि गेल्या ४ वर्षांपासून ते तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद होते. या प्रकरणी राणा कपूर यांना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मुंबईच्या विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला. यानंतर काही तासांत त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
७ प्रकरणांमध्ये मिळाला दिलासा
येस बँकेतील कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआय आणि ईडीनं राणा कपूर यांच्या विरोधात एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. राणा कपूर यांना जामीन मिळालेला हा शेवटचा खटला होता. सीबीआय प्रकरणांशी निगडीत विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी शुक्रवारी राणा कपूर यांना जामीन मंजूर केला. सध्या हा खटला प्रलंबित आहे आणि कपूर यांना तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलंय. यापूर्वी राणा कपूर यांना ७ प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण बँक फ्रॉडशी निगडीत आहे. राणा कपूर नवी दिल्लीतील प्रॉपर्टी केसमध्ये ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक लोन देण्याच्या प्रकरणी गेल्या ४ वर्षांपासून तुरुंगात आहेत. राणा कपूर यांनी येस बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह पदी असताना या कर्जाला अनधिकृत पद्धतीनं मंजुरी दिल्याचा आरोप सीबीआयनं केलाय.