वॉशिंग्टन/नवी दिल्ली: भारताच्या येस बँकेप्रमाणेच अमेरिकेच्या फर्स्ट रिपब्लिक बँकेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेच्या ११ मोठ्या बँका पुढे सरसावल्या आहेत. या बँका फर्स्ट रिपब्लिकमध्ये तब्बल ३० अब्ज डॉलर (सुमारे २.५ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करतील. यामुळे ठेवीदारांना पैसे काढताना कोणतीही अडचण येणार नाही. या ११ बँकांमध्ये जेपी मॉर्गन, सिटी ग्रुप, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फार्गो, मॉर्गन स्टॅनली, यूएस बँकॉर्प, ट्रस्ट फायनान्शियल, पीएनसी फायनान्शियल यांचा समावेश आहे.येस बँकेला वाचवण्यासाठी एसबीआयच्या नेतृत्वाखालील आठ वित्तीय संस्थांनी बँकेत १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम गुंतवली होती.
दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज
सिलिकॉन व्हॅली बँकेची मूळ कंपनी एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपने अमेरिकन कायद्यांतर्गत दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज दाखल केला आहे.
संकटाचा भारतावर परिणाम नाही
क्रेडिट सुईसच्या संकटाचा बँकिंग प्रणालीवर परिणाम होणार नाही. कारण, देशात तिची उपस्थिती फारच कमी आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जेफरीज इंडियानुसार, बँकेची मालमत्ता २०,००० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. क्रेडिट सुईसची केवळ एक शाखा भारतात आहे. अमेरिकन संकटवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सतत लक्ष ठेवून आहे.
४० अब्ज डॉलर्स काढले
फर्स्ट रिपब्लिक बँक देखील एसबीव्हीसारख्याच संकटाचा सामना करत होती. शुक्रवारी एसबीव्हीच्या ठेवीदारांनी काही तासांत ४० अब्ज डॉलर्स काढून घेतल्याने ती अडचणीत सापडली. फर्स्ट रिपब्लिक बँकेकडे गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत एकूण १७६.४ अब्ज डॉलर जमा होते.
आयडीबीआय बँकेचे खासगीकरण सुरू
केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया निर्धारित धोरणात्मक विक्री प्रक्रियेनुसार सुरू आहे. आयडीबीआयचे खासगीकरण पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त सरकारने फेटाळले आहे. या बँकेत सरकार आणि एलआयसी या दोघांचा मिळून ९४.७२ टक्के हिस्सा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"