Join us

Yes Bank नं ५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; पाहा काय आहे कारण, काय म्हटलं बँकेनं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:15 AM

Yes Bank News: खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाहा काय आहे कारण आणि काय म्हटलंय बँकेनं.

Yes Bank News: खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुनर्रचना प्रक्रियेअंतर्गत खर्चात कपात करण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतलाय. येत्या काळात बँकेत अशा प्रकारची आणखी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बडतर्फ कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या वेतनाएवढी नुकसान भरपाईही देण्यात आलीये.

ईटीच्या वृत्तानुसार, येस बँकेनं एका मल्टीनॅशनल अॅडव्हायझरच्या सल्ल्यानुसार, अंतर्गत पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं असून येत्या काही दिवसांत आणखी कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. येस बँकेनं याला दुजोरा देत आपल्या कर्मचाऱ्यांचा वर्कफोर्स बॅलन्स ठेवायचा असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हटलं बँकेनं?

"भविष्यासाठी मजबूत संस्था बनण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्ही कर्मचाऱ्यांना कसं जुळवून घेता येईल याचा आढावा घेत असतो. आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या भागधारकांना बँकेची पूर्ण क्षमता देण्यासाठी वचनबद्ध आहोत," असं येस बँकेच्या एका प्रवक्त्यानं म्हटलं.

डिजिटल बँकिंगवर लक्ष

ईटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेला डिजिटल बँकिंगवर लक्ष केंद्रित करायचं आहे. यासोबतच मॅन्युअल वर्कमध्ये कपात करण्याचा हेतू आहे. यामुळे बँकेला खर्चात ही कपात करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेमुळे बँकेला ऑपरेशनल खर्चात कपात करण्यास मदत होईल, असंही सूत्रांनी सांगितलं.

किती होतोय कर्मचाऱ्यांवर खर्च?

गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या परिचालन खर्चात सुमारे १७ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर २०२४ ते २०२३ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या खर्चात १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. आर्थिक वर्ष २०२४ अखेर बँकेनं कर्मचाऱ्यांवर ३७७४ कोटी रुपये खर्च केले होते, तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३३६३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आर्थिक वर्ष २०२४ अखेर बँकेत सुमारे २८,००० कर्मचारी होते आणि वर्षभरात बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत ४८४ कर्मचाऱ्यांची भर पडली.

टॅग्स :येस बँकनोकरी