मुंबई - रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्याने येस बँकेच्या लाखो खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातच आज येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीत येस बँकेच्या खातेदारांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आता येस बँकेच्या खातेधारकांना कुठल्याही बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करून येस बँकेने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे ३० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास कपूर यांना अटक करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या संचालक मंडळाला ३० दिवसांसाठी निलंबित केले आहे. तसेच स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. बँकेवर निर्बंध लादल्यानंतर बँकेबाहेर सुरक्षाही वाढविण्यात आली आहे, ग्राहकांनी सोशल मीडियावरुनही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बँकेच्या ठेवीदारांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी दिलासा दिला. ठेवीदारांचे सर्व पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही देतानाच याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आरबीआय प्रयत्न करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
येस बॅँकेच्या राणा कपूर यांना अटक; पहाटे 4च्या सुमारास ईडीकडून कारवाई
येस बँकेत ग्राहकांच्या रांगा, एटीएम सेंटरसमोरही गर्दी : ग्राहकांमध्ये अस्वस्थता
Yes Bank Crisis: 'अर्थमंत्र्यांचे भाषण ऐकून वाटते, अजूनही UPA सत्तेत आहे'
येस बॅँकेच्या आर्थिक नुकसानीला राणा कपूर जबाबदार असल्याचे ईडीच्या चौकशीतून समोर आले आहे. मनमानीपणे कर्जवाटप, वसुलीसाठी नियमबाह्य झुकते माप दिल्याचे व्यवहारांतून स्पष्ट झाले आहे. अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप आदी कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. तीन वर्षांपूर्वी बॅँकेने ६,३५५ कोटींचे कर्ज ‘बॅड लोन’मध्ये वर्ग केले. त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न केले नसल्याचा ठपका कपूर यांच्यावर असल्याचे समजते.
स्टेट बँकेचा ताबायेस बँकेचे २,४५0 कोटी रुपये किमतीचे २४५ कोटी समभाग खरेदीला स्टेट बँक ऑफ इंडियाने संमती दिली आहे. या बँकेच्या समभागांची संख्या केवळ १0 रुपये आहे. त्यामुळे येस बँकेची ४९ टक्के मालकी स्टेट बँकेकडे येईल. त्याला संमती मिळाल्यास सर्व कर्मचाऱ्यांना आहे त्या वेतनावर कामावर ठेवण्यात येईल आणि भाग-भांडवल २६ टक्क्यांपेक्षा कमी होऊ देणार नाही, असे स्टेट बँकेने म्हटले आहे.