yesmadam : वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द तुमच्याही कानावर अनेकदा पडला असेल. अलीकडच्या काळात कामातील तणाव वाढल्याने लोकांचं खासगी आयुष्यही अस्ताव्यस्त होत आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. मात्र, नोएडा स्थित ऑन-डिमांड ब्युटी सर्व्हिस प्लॅटफॉर्म 'येस मॅडम' या कंपनीतून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील सर्व कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासनाकडून एक मेल आला. यामध्ये तुम्हाला कामात ताण जाणवतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. या सर्व्हेत होकारार्थी उत्तर देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. या वर्क कल्चरवरून कंपनी वादात सापडली आहे.
१०० हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई
होम सलून सेवा देणारी YesMadam कंपनी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. आपल्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने कंपनी वादात सापडली आहे. विशेष म्हणजे ज्या कारणामुळे या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. रिपोर्टनुसार, YesMadam कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे विचारले की, त्यांना कामाचा ताण आहे का? ज्या कर्मचाऱ्यांनी याचं हो असं उत्त दिलं. त्या कर्मचाऱ्यांना लगेच नारळ देण्यात आला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
येस मॅडमच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडून कर्मचाऱ्यांना मिळालेला ईमेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ई-मेलनुसार, दिल्ली-एनसीआरस्थित कंपनीने कर्मचाऱ्यांच्या तणावाची पातळी मोजण्यासाठी सर्वेक्षण केले होते. निकालानंतर कंपनीने धक्कादायक निर्णय घेतला. वास्तविक, सर्वेक्षणानंतर, कंपनीने कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण, केलं अगदी उलट.
एचआर ई-मेलमध्ये असे लिहिले आहे की, 'प्रिय टीम, नुकतेच आम्ही कामाच्या ठिकाणी तणावाबद्दल तुमच्या भावना समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. यादरम्यान तुमच्यापैकी अनेकांनी तुमच्या समस्या मांडल्या, ज्याचे आम्ही खूप कौतुक करतो. मेलमध्ये पुढे असे लिहिले आहे की, निरोगी आणि सहकार्यपूरक कार्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कामाच्या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्यावर ताण पडू नये याची खात्री करण्यासाठी आम्ही अभिप्रायाचा काळजीपूर्वक विचार केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी गंभीर तणावाखाली असल्याची तक्रार केली आहे, त्यांना आम्ही कामातून मोकळं करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
रिपोर्टनुसार, येस मॅडम कंपनीने पाठवलेल्या ईमेलमध्ये काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कंपनीतील UX कॉपीरायटर अनुष्का दत्ता हिने एचआरच्या ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. आम्ही कामाच्या ठिकाणी तणाव असल्याचे सांगितल्याने कामावरुन काढून टाकल्याचं दत्ता यांनी लिहिलं आहे.
कंपनीकडून स्पष्टीकरण
येस मॅडम कंपनीत झालेल्या प्रकारानंतर कंपनीने त्वरीत स्पष्टीकरण जारी केले. निवेदनात म्हटले आहे, की 'सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टबद्दल आम्ही मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. आम्ही तणावामुळे कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. असे अमानवी पाऊल आम्ही कधीही उचलणार नाही. आमची सर्व कर्मचारी एका कुटुंबासारखे आहेत. त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम आणि आवड आमच्या यशाचा पाया आहे.
पब्लिसिटी स्टंट?
येसमॅडम कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काही युजर्सने याला पब्लिसिटी असल्याचे म्हटले आहे. तर काहींना कंपनीच्या कार्यशैलीवर टीका केली आहे.