Join us

Gautam Adani Group: योगी सरकारचा अदानी समूहाला झटका! ५ हजार कोटींचे टेंडर केले रद्द; नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:06 PM

Gautam Adani Group: एकीकडे शेअर मार्केटमधून प्रचंड मोठे नुकसान होत असताना, योगी सरकारने अदानी समूहाला मोठा झटका दिला आहे.

Gautam Adani Group: हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अदानींच्या १० पैकी सहा कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या लोअर सर्किट लिमिटमध्ये दिसत आहेत. अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये ५० हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर अदानी समूहामुळे एसबीआय, एलआयसी, पतंजलि यांच्यासह अनेकांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. यातच आता योगी सरकारने अदानी समूहाला मोठा झटका दिला आहे. २५ हजार कोटींपैकी ५ हजार कोटी रुपयांचे एक टेंडर रद्द करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ट्रान्समिशन, जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीकडून प्राप्त प्रीपेड स्मार्ट मीटरची निविदा रद्द करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात २.५ कोटी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या निविदेची किंमत २५ हजार कोटी होती. यामध्ये मध्यांचल विद्युत वितरण निगमने निविदा रद्द केली आहे. मध्यांचल विद्युत वितरण निगमची ५ हजार ४५४ कोटींची निविदा होती. निविदेची अंदाजे किंमत सुमारे 48 ते 65 टक्‍क्‍यांनी जास्त असल्याने सुरुवातीपासूनच विरोध होत होता. निविदेमध्ये मीटरची किंमत सुमारे ९ ते १० हजार रुपये दाखवण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रति मीटर ६ हजारच खर्च येऊ शकला असता, असे सांगितले जात आहे. 

आरोप-प्रत्यारोपांनंतर अदानी समूहाची निविदा रद्द

अदानी पॉवरच्या निविदेवरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता अखेरीस मध्यांचल विद्युत वितरण निगमचे अधीक्षक अभियंता वित्त अशोक कुमार यांनी अदानी समूहाची निविदा रद्द केली. तांत्रिक कारणामुळे निविदा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्य वीज ग्राहक परिषदेने निविदा रद्द करण्याचे समर्थन केले आहे. महागड्या निविदांमुळे याचा अतिरिक्त भार ग्राहकांवर पडतो, असे राज्य वीज ग्राहक परिषदेने म्हटले आहे. दुसरीकडे, अदानी पॉवर ट्रान्समिशन व्यतिरिक्त जीएमआर आणि इंटेली स्मार्ट कंपनीला टेंडरचा दुसरा भाग मिळाला होता. त्यांना काम करण्याचे आदेश दिले जाणार होते. मात्र, राज्य ग्राहक परिषदेने महागडे मीटर बसविण्याबाबत आक्षेप घेतला होता. तसेच नियामक आयोगात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. 

दरम्यान, बाजारातील घसरणीमुळे अदानी एंटरप्रायझेसला इंटरनॅशनल बॉन्ड आणि २०,००० कोटी रुपयांच्या FPO द्वारे सुमारे ५०० दशलक्ष डॉलर उभारण्याची योजना रद्द करावी लागली. अदानी एफपीओ हा देशातील सर्वात मोठा एफपीओ होता, जो पूर्ण सबस्क्राइब झाला होता, परंतु अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सतत घसरण झाल्यामुळे गौतम अदानी यांना तो मागे घ्यावा लागला आहे. गेल्या आठ ट्रेडिंग सत्रांमध्ये एकूण तोटा १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :योगी आदित्यनाथगौतम अदानीअदानी