Loan against Mutual Funds : आजकाल प्रत्येकाला कधी ना कधी कर्जाची गरज पडतेच. घर, गाडी, मेडीकल, शिक्षण, लग्न ते आता घरातील प्रत्येक वस्तूही हप्त्यावरच घेतली जाते. मात्र, अनेकदा लोक कर्ज घेण्याऐवजी त्यांच्या बचतीतून किंवा गुंतवणुकीतून पैसे काढतात. म्युच्युअल फंडासारख्या योजनेतून असे पैसे काढणे मोठं आर्थिक नुकसान करुन घेणे आहे. जर तुम्हीही तुमच्या म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ते आधी मनातून काढून टाका. कारण, तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडावर कर्ज घेऊ शकता. होय, तुम्ही बरोबर वाचलत. चला आता प्रोसेस समजून घेऊ.
देशातील अनेक बँका म्युच्युअल फंडांवर 10 ते 15 टक्के व्याजदराने कर्ज देतात. तुमच्याकडे इक्विटी म्युच्युअल फंड असल्यास, तुम्हाला त्याच्या मूल्याच्या 50 टक्के तर डेट म्युच्युअल फंड असल्यास, तुम्हाला 25 टक्के मार्जिन गहाण ठेवावे लागते.
पात्रतेचे नियम काय?म्युच्युअल फंडावर कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचे बचत खाते असणे आवश्यक आहे. तुमच्या बचत खात्यात दिलेला पॅन क्रमांक आणि म्युच्युअल फंडासाठी दिलेला पॅन क्रमांक सारखाच असावा. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. प्रत्येक बँकेकडे म्युच्युअल फंड हाउसची यादी असते. या यादीत तुमच्या फंड हाउसचा समावेश असेल तर तुमचं कर्ज पक्क समजा.
अर्ज कसा करायचा?म्युच्युअल फंडावर कर्ज घेण्यासाठी तुम्ही घरबसल्याही अर्ज करू शकता. तुमच्या बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. तिथे तुमच्या म्युच्युअल फंडाशी संबंधित आवश्यक तपशील भरुन ऑनलाइन कर्ज घेऊ शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष जाऊन देखील कर्जासाठी अर्ज करू शकता.
म्युच्युअल फंडांवर कर्ज कधी घ्यावे?जेव्हा तुम्हाला पैशांची नितांत गरज असेल आणि दुसरा पर्याय नसेल तेव्हाच म्युच्युअल फंडांवर कर्ज घेण्याचा विचार करावा. यासोबतच, तुम्ही हे कर्ज लवकरात लवकर फेडू शकाल याची खात्री असावी. म्युच्युअल फंडावर घेतलेल्या कर्जाची रक्कम फार मोठी नसावी आणि या कर्जाची मुदतही कमी असावी.
कधी कर्ज घेऊ नये?तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडाविरुद्ध कर्ज घ्यायचे असल्यास, तुम्हाला कर्ज मूल्याच्या किमान 50% मार्जिन म्हणून तारण ठेवावे लागेल. पण, जेव्हा शेअर बाजारात जास्त चढ-उतार होतात, तेव्हा हा फरक लवकरच नाहीसा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, बँक तुम्हाला अधिक म्युच्युअल फंड गहाण ठेवण्यास सांगू शकते किंवा तुमच्या गुंतवणुकीचा काही भाग विकण्यास सांगू शकते.