PM E-Drive Subsidy Scheme : सणासुदीच्या काळात नवीन मोटारसायकल, स्कूटर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग इलेक्ट्रिक वाह विकत घेण्याबाबतही विचार करू शकता. यासंबंधी चांगली बाब म्हणजे सरकारनं ईव्हीवर देण्यात येणारी नवीन सबसिडी योजना सुरू केली आहे. सरकारनं मंगळवारी पीएम ई-ड्राइव्ह योजना सुरू केली, ज्यामुळे लोकांना ईव्हीवरील सबसिडीचा फायदा मिळेल आणि त्यांना वाहन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल.
पीएम ई-ड्राइव्ह योजनेसाठी सरकारनं सुरुवातीला १०,९०० कोटी रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वेगवान करणं, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं आणि ईव्ही उत्पादनाची इकोसिस्टम विकसित करणं हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत लाभ
ही योजना १ ऑक्टोबर २०२४ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असेल, म्हणजेच २०२६ पर्यंत तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी सूट मिळत राहील. मात्र, हे अनुदान तुम्हाला थेट मिळणार नाही, पण सरकार ईव्ही कंपन्यांना देईल आणि मग त्या कंपन्या तुम्हाला किंमतीत कपात करुन सबसिडीचा लाभ देतील. १ एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ईएमपीएस-२०२४ चा (इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम) समावेश पीएम ई-ड्राइव्ह योजनेत करण्यात येणार आहे.
टू व्हीलर्सवर किती सबसिडी?
पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत बॅटरी पॉवरवर आधारित इलेक्ट्रिक टू-व्हीलर्ससाठी प्रति किलोवॅट अवर ५,००० रुपये सबसिडी निश्चित करण्यात आली आहे. योजनेच्या दुसऱ्या वर्षी ती निम्म्यानं कमी करून प्रति किलोवॅट २५०० रुपये प्रति किलोवॅट करण्यात येणार आहे. ओला, टीव्हीएस, एथर एनर्जी, हीरो विदा (हीरो मोटोकॉर्प) आणि बजाज चेतक या कंपन्यांची बॅटरी क्षमता सध्या २.८८ ते ४ किलोवॅट अवरपर्यंत आहे. त्यांची किंमत ९० हजार ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
संपूर्ण प्रक्रिया सोपी करण्यासाठी मोबाइल अॅप सुरू केलं जाईल. या माध्यमातून योजनेअंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी ई-व्हाउचर तयार करता येतील. एका आधारसाठी एका वाहनाला परवानगी दिली जाईल. गाडीची विक्री होताच त्याचं ई-व्हाउचर तयार होईल, अशी माहिती अवजड उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव हनीफ कुरैशी यांनी दिली.
या वाहनांनाही अनुदान मिळणार का?
पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत ई-२ डब्ल्यू, ई-३ डब्ल्यू, ई-अॅम्ब्युलन्स, ई-ट्रक आणि इतर ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी ३,६७९ कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. २४.७९ लाख इलेक्ट्रिक दुचाकी (ई-२ डब्ल्यू), ३.१६ लाख इलेक्ट्रिक थ्री व्हीलर्स (ई-३ डब्ल्यू) आणि १४,०२८ ई-बससाठी सबसिडी दिली जाणार आहे. ई-रिक्षासह तीनचाकी वाहनांना पहिल्या वर्षी २५ हजार रुपयांचं प्रोत्साहन मिळणार असून, दुसऱ्या वर्षी ते निम्म्याने कमी करून १२ हजार ५०० रुपये करण्यात येणार आहे.