मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत हमी व्याज उपलब्ध असून चक्रवाढ व्याजाचा लाभ उपलब्ध आहे. १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलीच्या नावावर पालक हे खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजना २१ वर्षात मॅच्युअर होते, परंतु तुम्हाला त्यात फक्त १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. सध्या या योजनेवर ८ टक्के दरानं व्याज मिळत आहे.
तुम्हालाही तुमच्या मुलीच्या नावानं हे खातं उघडायचं असेल, तर सध्या यासाठी पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया नाही. हे काम करण्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. पण जर तुम्ही एखादं खातं उघडलं असेल आणि त्यात काही वर्षांपासून गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर या योजनेत आतापर्यंत किती पैसे जमा केले हे तुम्ही नक्कीच ऑनलाइन पाहू शकता. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किमान गुंतवणूक २५० रुपये आहे आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वार्षिक जमा केले जाऊ शकतात.
असं उघडा खातं?बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटला भेट देऊन सुकन्या समृद्धी योजना फॉर्म डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून ती भरा आणि त्या सोबत मागितलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडा. यानंतर, भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे घेऊन जवळच्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिस शाखेत जा. सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत घ्या. यानंतर, तुम्ही ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडत आहात, तिथले कर्मचारी फॉर्म तपासतील आणि जोडलेल्या कागदपत्रांची मूळ कागदपत्रांशी जुळणी करतील. यानंतर तुमच्या मुलीच्या नावाने खातं उघडले जाईल. खातं उघडल्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी ऑनलाइन करू शकता.
ऑनलाइन कोणतं काम करू शकता?
- तुम्ही सुकन्या समृद्धी योजना खात्याचा फॉर्म ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
- पैसे ऑनलाइन जमा करता येतात.
- त्यानंतरचे हप्ते ऑनलाइन कापले जाऊ शकतात.
- तुम्ही ऑनलाइन शिल्लक तपासू शकता आणि स्टेटमेंट देखील पाहू शकता.
- तुम्ही खातं इतर कोणत्याही शाखेत ट्रान्सफर करू शकता.
- खातं मॅच्युअर झाल्यावर, संपूर्ण रक्कम मुलीच्या खात्यात ऑनलाइन हस्तांतरित केली जाऊ शकते.
जमा रक्कम कशी पाहालजमा केलेली रक्कम ऑनलाइन तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बँकेची नेटबँकिंग सुविधा वापरावी लागेल. प्रथम युजरनेम आणि पासवर्डच्या मदतीनं लॉगिन करा. यानंतर, तुम्हाला डॅशबोर्डमध्ये तुमच्या सर्व विद्यमान खात्यांच्या क्रमांकांची लिस्ट दिसेल. डाव्या बाजूला अकाउंट स्टेटमेंट या पर्यायावर क्लिक केलं तरी सर्व खात्यांची लिस्ट दिसेल. जेव्हा तुम्ही सुकन्या समृद्धीच्या खाते क्रमांकावर क्लिक कराल तेव्हा स्क्रीनवर या योजनेतील सध्याचा बॅलन्स दिसून येईल.