नवी दिल्ली-
तुमच्याकडे जर डिझल इंजिनवर चालणार वाहन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही घरबसल्या डिझेल मागवू शकणार आहात. डिझेलसाठीपेट्रोल पंपवर जाण्याची गरज आता भासणार नाही. सरकारी तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (BPCL) डिझेलच्या डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी (Doorstep Delivery Of Diesel) हमसफर इंडियासोबत (Humsafar India) हातमिळवणी केली आहे. त्यामुळे वाहनातील डिझेल संपल्यानंतर आता पेट्रोल पंपावर जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही घरबसल्या डिझेलची ऑर्डर देऊ शकणार आहात.
घरबसल्या कशी मिळवाल सुविधा?
डोअरस्टेप डिलिव्हरीची सुविधा केवळ २० लीटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. डोअरस्टेप डिझेलची डिलिव्हरी सुविधेचं नाव सफर-२० (Safar20) असं देण्यात आलं आहे. या सुविधेमुळे उद्योग, मॉल्स, रुग्णालयं, बँका, शेतकरी, मोबाइल टॉवर, शिक्षण संस्थांसोबत लघु उद्योगांना याचा फायदा होणार आहे. डोअरस्टेप डिझेलसाठीचा घाऊक पुरवठा देखील सुरू करण्यात आला आहे.
'हमसफर अॅप'वरुन बुक करा ऑर्डर
दिल्लीतील स्टार्टअप हमसफर इंडियाचं ''फ्यूअल हमसफर'' नावाचं मोबाइल अॅप यासाठी डाउनलोड करावं लागणार आहे. फ्यूअल हमसफर अॅपच्या माध्यमातून सध्या पंजाबच्या पटियाळा आणि मलेरकोटला येथे २० लीटरच्या जेरी कॅनमधून डिझेलची डिलिव्हरी देण्यास सुरुवात देखील झाली आहे. एका वेळेस जास्तीत जास्त २० लीटरपर्यंत डिझेलची गरज असणाऱ्यांनाच ही सुविधा सध्या प्राथमिक पातळीवर दिली जात आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात, गोवा, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद आणि गाझियाबादसह देशाची राजधानी व एनसीआर क्षेत्रात देखील ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.