Join us

झटपट Personal Loan मिळवण्यासाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? काही तासांत पैसे बँक खात्यात होतील जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:51 PM

Instant Personal Loan : तुम्हाला अचानक पैशांची गरज भासल्यास झटपट पर्सनल लोन चांगला पर्याय आहे. काही तासांत तुमच्या बँख खात्यात पैसे जमा होतात.

Instant Personal Loan : देशभर सणासुदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्यात. येत्या काही दिवसांत धनत्रयोदशी आणि दिवाळीसारखे मोठे सण आहेत. या काळात लोक भरपूर खरेदी करतात. जर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल. त्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी इन्स्टंट पर्सनल लोन हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. या कर्जासाठी अर्ज केल्यानंतर काही तासांत पैसे तुमच्या खात्यात येतात. याची ऑनलाईन प्रोसेस आज समजून घेऊ. म्हणजे येत्या दिवाळीत तुमच्या स्वप्नांमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही.

इन्स्टंट पर्सनल लोन म्हणजे काय?इन्स्टंट पर्सनल लोन हे एक प्रकारचे असुरक्षित कर्ज आहे. ज्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन अर्ज करुन झटपट कर्ज मिळवू शकता. या प्रकारच्या कर्जामध्ये सहसा झटपट अर्ज प्रक्रिया आणि जलद पैसे हस्तांतरण असते. यामुळे कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला लगेच पैसे मिळतात.

इन्स्टंट पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करावा?

  • झटपट वैयक्तिक कर्जासाठी अर्ज मिळवण्यासाठी, प्रथम तुमचा आधार आणि पॅन कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर बँकेकडे रजिस्टर असणे आवश्यक आहे. नसेल तर तो नोंदवावा लागेल.
  • तुम्ही तुमचे तपशील सबमिट केल्यानंतर बँक तुमचे तपशील तपासते. यामध्ये तुम्ही कर्जासाठी पात्र आहात का? ते पाहिले जाते.
  • कर्जा घेण्यास पात्र झाल्यानंतर तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम आणि परतफेडीचा कालावधी निवडावा लागतो. 
  • अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, काही तासांत पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातात. काही प्रकरणांमध्ये, तुमच्या बँक खात्यात पैसे दिसण्यासाठी २४ तास लागू शकतात.

कर्जासाठी काय आहे पात्रता?

  • तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. काही बँकााचा नियम २१ वर्षांपर्यंत आहे. 
  • चांगला क्रेडिट स्कोअर असणे महत्त्वाचे आहे. बहुतेक बँका ७०० पेक्षा जास्त स्कोअर चांगला मानतात. जास्त स्कोअर असेल तर कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता असते.
  • जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल, तर तुमच्या सध्याच्या मालकाकडे किमान एक वर्षभर काम केलेले हवे. स्वतःचा व्यवसाय असल्यास उत्पन्नाचा स्त्रोत दाखवावा लागतो.

झटपट वैयक्तिक कर्जाचे फायदे

  • झटपट वैयक्तिक कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे यासाठी कुठलेही तारण ठेवण्याची गरज नाही.
  • अचानक पैशाची गरज भासल्यास झटपट वैयक्तिक कर्ज हा एक योग्य पर्याय असू शकतो. कारण काही तासांत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
  • तुमची आर्थिक स्थिती आणि क्षमतेनुसार तुम्ही  परतफेड पर्याय निवडू शकता. अनेक बँका तुम्हाला फोरक्लोजर फी न आकारता लवकर कर्ज फेडण्याची परवानगी देतात.
  • या कर्जासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेच्या दारात जाण्याची गरज भासत नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता.
टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा