मुंबई - काही महिन्यांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर नारायण मूर्ती यांनी देशातील तरूणांनी आठवड्याला ७० तास काम केले तर भारत जगाच्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करू शकेल असं विधान केले होते. या विधानाने बरीच चर्चा रंगली. त्यानंतर आता एल अँन्ड टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एन सुब्रमण्यम यांनी केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० तास काम करावे असा सल्ला सुब्रमण्यम यांनी दिलाय. त्यांच्या या सल्ल्यामुळे सोशल मीडियात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय. त्याशिवाय सुब्रमण्यम यांच्या पगारावरही अनेकांनी भाष्य केले आहे.
सोशल मीडियात संजीत कुमार नावाच्या युजरने सुब्रमण्यम यांच्या विधानाचा हवाला देत त्यावर म्हटलंय की, थांबा, मला काही बाबी शेअर करू द्या. या व्यक्तीला मागील आर्थिक वर्षात ४३ टक्के इतकी घसघसीत पगारवाढ मिळाली आहे तर एल अँन्ड टी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी १.७४ टक्के पगारवाढ दिली आहे. हे योग्य बोलतायेत. ते मजबूर आहेत त्यामुळे अशाप्रकारची विधाने करतायेत. त्यांना समजून घ्या कारण गुंतवणूकदारांचा खूप प्रेशर आहे असा खोचक चिमटा काढला आहे.
एस.एन सुब्रमण्यम यांना पगार किती?
२०२३-२४ या आर्थिक वर्षात एस. एन. सुब्रह्मण्यन यांना एकूण पगार, बोनस, आणि अन्य फायदे मिळून करोडो रुपयांचे मानधन मिळालं आहे. सुब्रमण्यम यांचा एकूण पगार ५१ कोटी इतका असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यांना ४३.११ टक्के पगारवाढ मिळाली आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण संतापली...
एस.एन सुब्रमण्यम यांनी केलेले विधान सोशल मीडियात गाजत असतानाच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेही यावर प्रतिक्रिया दिली. एका पत्रकाराची पोस्ट शेअर करत दीपिकाने इन्स्टावर लिहिलं की, इतक्या मोठ्या उंचीवर असलेल्या माणसानं असं विधान करणे आश्चर्यकारक आहे. मानसिक आरोग्य हेदेखील महत्त्वाचं आहे असं तिने म्हटलं आहे.
कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
सोशल मीडियात एस.एन सुब्रमण्यम यांचं विधान व्हायरल झाल्यानंतर कंपनीकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. L&T कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, एल अँड टी राष्ट्र निर्माणावर विश्वास ठेवते आणि तीच आपली प्राथमिकता मानते. एल अँड टीमध्ये, राष्ट्रनिर्माण हे आमच्या कार्याचे मुख्य केंद्र आहे. गेल्या आठ दशकांपासून आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, उद्योग आणि तांत्रिक क्षमतांना आकार देत आहोत. हा काळ असा आहे जेव्हा आपल्याला एकत्रितपणे समर्पण आणि प्रयत्नांसह प्रगतीच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत आणि आपल्या सामूहिक दृष्टिकोनाला साकार करायला हवे असं त्यांनी सांगितले.