Lokmat Money > बिझनेस न्यूज > १०५ वर्षांच्या स्थलांतरित महिलेची तरुण जीवनेच्छा

१०५ वर्षांच्या स्थलांतरित महिलेची तरुण जीवनेच्छा

सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

By admin | Published: October 28, 2015 10:05 PM2015-10-28T22:05:06+5:302015-10-28T22:05:06+5:30

सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

Young people of 105 years of migrant love | १०५ वर्षांच्या स्थलांतरित महिलेची तरुण जीवनेच्छा

१०५ वर्षांच्या स्थलांतरित महिलेची तरुण जीवनेच्छा

ओपॅटोवॅक (क्रोएशिया): सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लहान मुले, तरुण, नवविवाहित, मध्यमवयीन लोकांनी मातृभूमी सोडून परागंदा होण्याचा पर्याय नाइलाजाने स्वीकारला.
या स्थलांतरितांमध्ये अफगाणिस्तानातील एक १०५ वर्षांच्या आजींचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे. लहानसहान संकटामुळे जीवनाची आशा सोडणाऱ्या तरुणांची उदाहरणे डोळ्यांसमोर असताना या वयात अजूनही चांगल्या जीवनाच्या आशेने युरोपात २० दिवसांचा खडतर प्रवास करून आलेल्या या आजींचा प्रवास तितकाच रोमांचकारक आहे.
बिबिहाल उझबेकी या अफगाणिस्तानातील कुडुंझ या गावातील १०५ वर्षांच्या आजी आहेत. तालिबानने नुकताच या शहरावर ताबा घेत पुन्हा शरिया कायदा लादला आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून बिबिहाल आजी आणि त्यांच्या १७ जणांच्या कुटुंबाने अफगाणिस्तान सोडून युरोपात जाण्याचा निर्णय घेतला. वयपरत्वे हालचालींवर मर्यादा आलेल्या असूनही बिबिहाल आजींनीही युरोपात जाण्याचा निश्चय केला. या २० दिवसांच्या खडतर प्रवासात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ६७ वर्षांच्या मुलाच्या आणि १९ वर्षांच्या नातवाच्या पाठुगळी बसून त्यांनी अखेर क्रोएशियात प्रवेश केला आहे.
प्रवासाविषयी बोलताना बिबिहाल आजी फारसीतून सांगतात, माझे पाय फारच दुखतात, मी एक दोनदा खालीही पडले, त्याच्या खुणाही माझ्या डोक्यावर आहेत, पण मी जिद्द सोडली नाही. क्रोएशियामध्ये प्रवेश केल्यानंतर उझबेकी कुटुंबाची कागदपत्रे तपासण्यात आली. आता स्लोव्हेनिया आणि शेवटी स्वीडनला जाण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांचा नातू मुहामदने सांगितले.
१रानावनातून, दऱ्या-खोऱ्यांमधून प्रवास करणे त्यांच्यापेक्षा कित्येक वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणांनाही कष्टदायक असते; परंतु सर्व अडथळ्यांवर जिद्दीने मात करणाऱ्या ध्येयशक्तीला क्रोएशियन पोलिसांनीही सलाम केला. या प्रवासात पाऊस, कडाक्याचे ऊन, थंडी अशा हवामानातील तीव्र बदलांंचा त्यांना सामना करावा लागला.
२इतक्या खडतर प्रवासातून युरोपात आलेल्या आजींना पाहून क्रोएशियन लोकांनी आश्चर्य आणि आनंदही व्यक्त केला. क्रोएशियन रेड क्रॉसने त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता स्वीडनच्या दिशेने जाणाऱ्या बिबिहाल आजींच्या मनात कदाचित ‘मज अनुभवू दे सुखक्षणां, इतुक्या लौकर येई न मरणां’ हेच शब्द असावेत.

Web Title: Young people of 105 years of migrant love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.