Join us  

पाऊस आणि पुरामुळे तुमचे बजेट बिघडणार, जुलैमध्ये महागाई आणखी वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 9:10 AM

Inflation : डाळी, भाजीपाला आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती खूप वाढतील आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी जून महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार जून महिन्यात किरकोळ महागाई ४.८१ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी मे महिन्यात ४.२५ टक्के होती. अशा स्थितीत आगामी काळात महागाई आणखी वाढणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. डाळी, भाजीपाला आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती खूप वाढतील आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, टोमॅटो, कोथिंबिर, भेंडी, लौकी यासह सर्व हिरव्या भाज्या जुलै महिन्यात आणखी महाग होतील. त्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, त्यानंतर काही राज्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. विशेषतः अतिवृष्टीमुळे बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे टोमॅटो, वांगी, भेंडी, कारले, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबिर यासह अनेक हिरव्या भाज्यांचे उत्पादन कमी होईल. बाजारात या भाज्यांचा तुटवडा असल्याने त्यांचे भाव गगनाला भिडणार आहेत.

ब्रोकरेज फर्म बार्कलेजचे एमडी आणि अर्थशास्त्रज्ञ राहुल बाजोरिया यांनी महागाईबाबत अंदाज व्यक्त केला आहे. जर अल निनोची परिस्थिती कायम राहिल्यास जुलै २०२३ मध्ये किमती पुन्हा वाढू शकतात. मात्र, घर, कपडे, चपला यांचा महागाई दर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचेही राहुल बाजोरिया सांगितले. याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात महागाईचा कोणताही परिणाम होणार नाही. विशेष बाब म्हणजे मे महिन्यात किरकोळ महागाई दर ४.३४ टक्के राहण्याचा अंदाज राहुल बाजोरिया यांनी व्यक्त केला होता, जो ४.२५ च्या अगदी जवळ आहे. 

तूरडाळ १५ ते २० टक्क्यांनी महागगेल्या एका महिन्यात देशात टोमॅटोच्या किमती ३२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात एक किलो टोमॅटोचा भाव १५ ते ५० रुपये होता, तो आता २५० रुपये झाला आहे. देशात पावसाळा असाच सुरू राहिला तर त्याचे भाव आणखी वाढू शकतात. त्याचप्रमाणे कांदाही महाग झाला आहे. महिनाभरापूर्वी २० रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता २५ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. विशेष म्हणजे महागाईचा फटका डाळींनाही बसला आहे. ९० ते १०० रुपये किलोने विकली जाणारी तूरडाळ आता १५० ते १६० रुपये किलोने विकली जात आहे. तूरडाळ डाळ घाऊक दरात १५ ते २० टक्क्यांनी महाग झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान आणि महागाईचा परिणाम लोकांवर होणार पावसाची आणि पुराची स्थिती अशीच सुरू राहिल्यास बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे या राज्यांमध्ये महागाई आणखी वाढेल. विशेष म्हणजे अल निनोची स्थिती मजबूत झाली तर खरीप पीक उद्ध्वस्त होईल. हवामान आणि महागाई या दोन्ही परिस्थितींचा परिणाम येथील लोकांवर होणार आहे.

टॅग्स :महागाईव्यवसायपाऊस