नवी दिल्ली : वेळेत कर्ज परतफेड करण्याबाबत आपला उद्योग समूह बांधील आहे, असे प्रतिपादन रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांनी केले आहे. समूहातील कंपन्यांचे समभाग आपटल्याच्या पार्श्वभूमीवर अंबानी यांनी हे वक्तव्य केले आहे.
अनिल अंबानी यांनी पत्रकारांना सांगितले की, आपल्या समूहाने मागील १४ महिन्यांच्या काळात ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना तसेच वित्तीय संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे साह्य मिळत नसताही १ एप्रिल २०१८ ते ३१ मे २०१९ या काळात आपल्या समूहाने २४,८०० कोटी रुपयांची मुद्दल आणि १०,६०० कोटी रुपयांचे व्याज फेडले आहे. कर्जफेड करण्यात आलेल्या कंपन्यांत रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा यांचा समावेश आहे. अनिल अंबानी यांनी म्हटले की, अनावश्यक अफवा, अंदाज आणि शेअर बाजारातील आमच्या कंपन्यांच्या समभागांची घसरण यामुळे गेल्या काही आठवड्यांत आमच्या हितधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ही कारणे विलंबाची
च्आपल्या समूहातील काही समस्यांना नियामकीय संस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब जबाबदार आहे. निवाडे येण्यास उशीर झाल्यामुळे समूहाला ३० हजार कोटी रुपये मिळण्यात अडथळे आले आहेत.
च्यातील अनेक प्रकरणे पाच ते दहा वर्षांपासून नियामकीय व न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहेत. याचा फटका बसलेल्या आमच्या कंपन्यांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांचा समावेश आहे.