नवी दिल्ली : या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक बोलावली आणि रेपो दरात (Repo Rate) 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. दरम्यान, आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी पुन्हा रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. रेपो दरात वाढ झाल्यास गृहकर्ज, कार कर्ज घेणार्यांवर ईएमआयचा बोजा वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर सोमवारी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी CNBC-TV18 वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, पुढील होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी चलनविषयक धोरण समिती व्याजदरात वाढ करत राहील, परंतु रेपो दर प्री-कोविड पातळीपर्यंत वाढेल, हे सांगणे खूप घाईचे ठरेल, असेही शक्तिकांत दास म्हणाले.
याचबरोबर, शक्तिकांत दास म्हणाले, "दर वाढीचा अंदाज लावणे फार अवघड काम नाही. रेपो रेट थोडा वाढेल, पण किती वाढेल याबद्दल आता मी काही सांगू शकत नाही. पण, तो वाढून 5.15 टक्के होईल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मार्केटचा हा अंदाज योग्य आहे की, चलनविषयक धोरण समितीला पुढील बैठकीत दर वाढवायचा आहे." याशिवाय, वाढत्या महागाईबाबत शक्तिकांत दास म्हणाले की, आता महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक कृती समन्वयाने केल्या जात आहेत. अलीकडील वित्तीय उपायांचा आगामी काळात महागाईवर परिणाम होईल.
एमपीसीची बैठक 6 ते 8 जून दरम्यान होणारआरबीआयची चलनविषयक धोरण समितीची बैठक 6 ते 8 जून दरम्यान होणार आहे. शक्तिकांत दास 8 जून रोजी लनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांबद्दल सविस्तर माहिती देतील.