नवी दिल्ली : २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या तरुण पिढीला क्रिप्टोकरन्सीने भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे किप्टो करन्सीचा वापर करणाऱ्या या तरुणांपैकी ५५ टक्के तरुण हे छोट्या शहरांतील आहेत.
सूत्रांनी सांगितले की, १८ महिन्यांपूर्वीपर्यंत अस्तित्वातही नसलेल्या ‘कॉइनस्विच कुबेर’ या क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग ॲपवर आजच्या घडीला तब्बल ११ दशलक्ष वापरकर्ते आहेत. या वापरकर्त्यांचे सरासरी वय २५ वर्षे आहे.
विशेष म्हणजे यातील ५५ टक्के तरुण नवी दिल्ली व मुंबई यासारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत अगदीच छोट्या असलेल्या शहरांतील आहेत. कॉइनस्विच कुबेर हे ॲप क्रिप्टो करन्सीच्या एक्स्चेंजसारखे काम करते. त्यावर बिटकॉइन, एथेरियम, कार्डानो आणि सोलाना यासारख्या प्रतिष्ठित क्रिप्टो चलनांचे आदान-प्रदान होते. २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या या मुलांना मिलेनियल्स किंवा जनरेशन झेड असे म्हटले जाते. यातील कोणालाही शेअर बाजार अथवा रोखे यांबद्दल फारसी माहिती नाही. मात्र, ते थेट बिटकॉइनसह अन्य क्रिप्टो चलनांमध्ये खेळताना दिसून येत आहेत. ‘कॉइनस्विच कुबेर’ने आपल्या जाहिरात मोहिमेसाठी तरुणांचा आयकॉन असलेल्या एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याला करारबद्ध केले आहे.
पूर्वी व्हायचे चोरून-लपून व्यवहार
जनरेशन झेडकडून मोठ्या प्रमाणात स्वीकृती मिळाल्यामुळे क्रिप्टो करन्सी काळोखातून बाहेर आली आहे. २०१८ मध्ये क्रिप्टो एक्स्चेंज चालविणाऱ्या व्यावसायिकांना काही काळासाठी बंगळुरू पोलिसांच्या कोठडीत राहावे लागले होते.
बंगळुरूच्या एका शॉपिंग मॉलमध्ये त्यांनी क्रिप्टो एक्स्चेंजचा तंबू उघडला होता, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झाली होती. त्यानंतर क्रिप्टो करन्सीचे व्यवहार चोरी-छिपे व्हायला लागले; पण आता काळ बदलला असून जनरेशन झेडकडून मोठ्या प्रमाणात स्वीकृती मिळाल्यामुळे क्रिप्टो व्यवहार उघडपणे होऊ लागले आहेत.
तरुणाई पडतेय क्रिप्टोकरन्सीच्या प्रेमात; छोट्या शहरांतूनही मिळतोय मोठा प्रतिसाद
२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या तरुण पिढीला क्रिप्टोकरन्सीने भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे किप्टो करन्सीचा वापर करणाऱ्या या तरुणांपैकी ५५ टक्के तरुण हे छोट्या शहरांतील आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:49 AM2021-10-19T05:49:41+5:302021-10-19T05:51:10+5:30