व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि शेअर प्लॅटफॉर्म युट्युबनं (Youtube) अनेकांना ओळख मिळवून दिली आहे. इतकंच नाही तर अनेकांना श्रीमंतही केलंय. फ्लाइंग बीस्ट चॅनलद्वारे आपला ठसा उमटवणाऱ्या गौरव तनेजाचाही त्यात समावेश आहे. आता त्यानं त्याच्या कमाईशी संबंधित एक मोठा खुलासा केलाय.
गौरव तनेजानं सोशल मीडिया इन्फुएन्सर राज शामानी यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या कमाईशी संबंधित मोठा खुलासा केला आहे. आता आपण एअरएशिया कंपनीच्या सीईओपेक्षा जास्त कमावतो, असं त्यानं म्हटलं. ही तीच कंपनी आहे ज्यात गौरव पायलट म्हणून कार्यरत होता आणि काही कारणांमुळे कंपनीनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. गौरव व्लॉगिंग करतो आणि तो फिटनेस इन्फ्लुएंसर म्हणूनही त्याला खूप पसंती मिळते.
कोण आहे गौरव तनेजा
फ्लाइंग बीस्ट या नावाने ओळखला जाणारा गौरव तनेजा हा YouTuber आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. याआधी तो पायलट होता आणि आपण डायटिशियन होतो असा दावाही त्यांनं केला होता. दिल्ली विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त, गौरवनं दावा केला आहे की तो आयआयटी-केजेपीचा माजी विद्यार्थी आहे. या ठिकाणाहून त्यानं सिव्हिल इंजिनीअरिंग केलं आहे. तो त्याची पत्नी आणि कुटुंबासह व्लॉग, फिटनेस व्हिडिओ बनवतो.
एअर एशियावर केलेले आरोप
गौरव तनेजा एअरएशियामध्ये पायलट होता आणि २०२० मध्ये त्याच्या काही व्हिडीओंमध्ये त्याने एअरलाइनवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. वैमानिकांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांना आणि दबावांना तोंड द्यावं लागतं हे गौरवनं सांगितलं होतं. त्यावेळी विमान कंपनीनं त्याला निलंबित केलं. परंतु आता गौरवचा दावा आहे की तो कंपनीच्या सीईओपेक्षा जास्त कमाई करत आहे.
लाखो फॉलोअर्स
२०२० मध्ये कोविड-१९ महासाथीपासून गौरव तनेजा पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर म्हणून आपली ओळख कायम करून आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे ८६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पत्नी रितू राठी सोबत तो ३ यूट्यूब चॅनल चालवतो.