Join us

अबब! ‘झेरोधा’चे कामत बंधू घेणार ‘इन्फोसिस’च्या सीईओंपेक्षाही अधिक वेतन; आकडा पाहून डोळे विस्फारतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:45 AM

कंपनीच्या संचालक मंडळाने याबाबत नुकताच एक ठराव पारित केला

नवी दिल्ली : देशातील आघाडीची स्टॉक ब्रोकरेज कंपनी ‘झेरोधा’चे संस्थापक असलेले नितीन आणि निखिल कामत बंधू प्रत्येकी तब्बल १०० कोटी रुपये वार्षिक वेतन घेणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने याबाबत नुकताच एक ठराव पारित केला. कंपनीच्या कायमस्वरूपी संचालक म्हणून नेमलेल्या नितीन कामत यांच्या पत्नी सीमा पाटील यांनाही १०० कोटी रुपये वार्षिक वेतन मिळणार आहे.संचालक मंडळाच्या निर्णयानुसार तिघांनाही विविध भत्त्यांसह दरमहा ४.१७ कोटी रुपये वेतन मिळणार आहे. इतर मोठ्या कंपन्यांसोबत तुलना केल्यास, कामत यांचे वेतन ‘इन्फोसिस’चे सीईओ सलील पारेख यांच्यापेक्षा दुप्पट आहे. पारेख यांना वार्ष‍िक ४९.६८ कोटी रुपये वेतन प्राप्त होते. झेरोधा या स्टार्टअप कंपनीने गेल्या आर्थ‍िक वर्षात ४४२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. एकीकडे जगभरातील अनेक स्टार्टअप कंपन्या तोट्यात असताना झेरोधाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कंपनीची कामगिरी शेअर बाजारांमधील कामगिरीवर थेट संलग्नित असून, भारतीय शेअर बाजारांची कामगिरी सध्या चांगली असल्याचे नितीन कामत यांनी सांगितले. कंपनी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ‘बायबॅक’ योजना राबविणार आहे. गेल्या वर्षी १ अब्ज डॉलर्स एवढ्या मूल्याचे ‘बायबॅक’ केले होते. यावर्षी २ अब्ज डॉलर्स एवढे बायबॅक करण्यात येणार आहे.हुरुन इंडिया यादीत पहिल्यास्थानीगेल्या वर्षी कामत बंधू ‘हुरुन इंडिया’च्या भारतातील ४० वर्षांखालील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरले होते. एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असलेल्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला होता. गेल्या वर्षी  त्यांच्याकडे सुमारे २४ हजार कोटी रुपयांची संपत्ती होती.  कामत बंधूंनी २०१० मध्ये झेरोधा या भारतातील पहिल्या स्टॉक ब्रोकरेज कंपनीची स्थापना केली होती.