Zerodha Glitch: झिरोदाची सकाळ काही युजर्ससाठी चांगली ठरली नाही. या दरम्यान काही युझर्सना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. एका युजरनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून यासंदर्भात माहिती देत तक्रारही केली. झिरोदाच्या तांत्रिक त्रुटींमुळे १५ लाख रुपयांचे नुकसान झालं असल्याचं युझरनं म्हटलं. या संपूर्ण प्रकरणावर कंपनीच्या वतीनं एक निवेदनही जारी करण्यात आलं.
झिरोदाची भूमिका काय?
झिरोदा शुक्रवारी ३० मिनिटं डाऊन होतं. सकाळी १०.५३ ते ११.२५ या वेळेत काही युजर्सना अडचणींना सामोरं जावं लागलं. यावर झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांनी उत्तर देत मुंबई शेअर बाजारात समस्या होती. त्यात कंपनी काहीच करू शकली नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
'बीएसईमधील कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे बीएसई एफ अँड ओमधील काही युजर्सच्या ऑर्डर 'ओपन पेंडिंग' दाखवत होत्या. ही समस्या इतर ब्रोकर्ससोबतही होती, असं कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं. ही पोस्ट झिरोदानं शुक्ररवारी सकाळी शेअर केली होती. सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर झिरोदानं ही माहिती अॅपद्वारे गुंतवणूकदारांना दिली.
१५ दिवसांत दुसरी समस्या
झिरोदा ग्राहकांना गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा अशा समस्येला सामोरं जावं लागलं. एका युजरने एक्सवर लिहिलं, 'जवळपास ९२ रुपयांचा नफा झाला. पण झिरोदामुळे हे शक्य होऊ शकले नाही. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत १९ रुपयांचे नुकसान झालं होतं,” असं एका युझरनं म्हटलंय.
अनिल हुडा नावाच्या व्यक्तीने एक्सवर लिहिलं की, "झिरोदाच्या कमतरतेमुळे आज १५ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. सकाळी १०.५५ वाजल्यापासून ही ऑर्डर पेंडिंग होती. ते ऑर्डर कॅन्सलही करू शकले नाहीत किंवा ती अपडेटही करू शकले नाहीत. पण ११.२४ मिनिटांनी सर्व ऑर्डर जुन्या किमतीत एक्झिक्युट झाल्या. परिणामी दोन वेगवेगळ्या खात्यांमुळे माझ्यावर शेअर्स विकण्यासाठी दबाव आला आणि १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हे मान्य नाही," असं त्यांनी म्हटलं. अशा तऱ्हेनं अनेक युजर्सनी एक्सवर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.