भारताचा देश श्रीलंका (Sri Lanka) स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात पेट्रोल-डिझेलचा साठा संपला आहे, महागाई गगनाला भिडली आहे, खाद्यपदार्थांचा प्रचंड तुटवडा आहे आणि लोड शेडिंगही मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. या सर्वांमध्ये, ऑनलाइन ब्रोकिंग फर्म झिरोदाचे (Zerodha) सह-संस्थापक (Co-Founder) निखिल कामत (Nikhil Kamath) यांनी श्रीलंकेच्या संकटाशी संबंधित एक महत्त्वाचा धडा सर्वांना सांगितला. कोणीही दीर्घकाळ आपल्या कमाईपेक्षा अधिकजास्त खर्च करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
शेजारी देशात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निखिल कामत यांनीही ट्विटद्वारे समर्पक प्रश्न विचारला आहे. "तुम्ही कमावलेल्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नाही, किमान कायमचे तर नाहीच. हे सर्वांना लागू होते. नुकताच श्रीलंकेला याचा मोठा फटका बसला, अमेरिकेला कधी बसणार?," असा प्रश्न निखिल कामत यांनी विचारला आहे.
You cant spend more than you earn, not forever at least, applies to everyone. Srilanka bore the brunt of this recently, when will the US?
— Nikhil Kamath (@nikhilkamathcio) April 5, 2022
श्रीलंकेत आर्थिक संकट
निखिल कामत यांचं हे ट्वीट अशा वेळी आले आहे जेव्हा श्रीलंका परकीय चलनाच्या तीव्र तुटवड्यामुळे ५१ अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत आहे. कोरोना महामारीमुळे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांपासून चहा आणि रबरसारख्या वस्तूंची निर्यात करता आली नाही. याच्या माध्यमातूनही त्यांना परकीय चलन मिळत होतं. याशिवाय श्रीलंका पर्यटनातून परकीय चलन मिळवते आणि परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या नागरिकांनी पाठवलेले पैशांच्या माध्यमातूनही कमाई केली जाते. परंतु हेदेखील कोरोना महासाथीच्या काळात ठप्प झालं होतं. याच कालावधीत आयात वाढल्याने श्रीलंकेकडे आधीच असलेलं परकीय चलन संपुष्टात येण्याच्या मार्गावर आलं.