Join us

Rekha Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीत कामथ बंधूंनी खरेदी केले ११.४६ लाख शेअर्स, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 10:54 AM

झिरोदाचे संस्थापक निखिल कामथ आणि नितीन कामथ यांनी झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीत ११.४६ लाख शेअर्स खरेदी केले आहेत.

झिरोदाचे संस्थापक निखिल कामथ आणि नितीन कामथ यांनी नाझारा टेक्नॉलॉजीज (Nazara Technologies Ltd) लिमिटेडमध्ये ११.४६ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीमध्ये शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे. झिरोदा या देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्मच्या कामथ बंधूंनी प्रेफरेंशियल इश्यूद्वारे मल्टीबॅगर गेमिंग स्टॉकमध्ये हिस्सा विकत घेतला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे ६५.८८ लाख शेअर्स आहेत. भारतीय गेमिंग कंपनी नझारा टेक्नॉलॉजी लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी २८.६ लाख फुल्ली पेड अप इक्विटी शेअर्सच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. कंपनी ८६८ रुपये प्रति शेअर या प्रीमियमनं २५० कोटी रुपये उभारण्यासाठी प्रेफरन्शिअल इश्यू आणत आहे. 

२ मार्च रोजी, नाझारा टेक्नॉलॉजीच्या संचालक मंडळानं प्रेफरन्शिअल इश्यूच्या या वाटपास मान्यता दिली आहे. हे शेअर्स अनेक गुंतवणूकदारांना प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे प्रेफरन्शिअल बेसिसवर वाटप करण्यात आले आहेत.  

झिरोदाच्या निखिल कामथ आणि नितीन कामथ यांची भागीदारी कामत असोसिएट्स या फर्मला या इश्यूमध्ये ५.७३ लाख शेअर्स मिळाले असून त्यांनी त्यासाठी ५० कोटी रुपये दिले आहेत. तर एनके स्क्वाड या आणखी एका कंपनीला ५.७३ लाख शेअर्स मिळाले आहेत, ज्यात निखिल आणि नितीन कामथ यांचा हिस्सा आहे.  

५०११ कोटी रुपयांचं बाजारमूल्य 

नझारा टेक्नॉलॉजीजचं बाजार मूल्य ५०११ कोटी रुपये आहे. कंपनीवर फक्त १०९ कोटी रुपयांचे कर्ज आहे जे तिच्या मार्केट कॅपच्या दोन टक्के आहे. गेल्या एका वर्षात नाझारा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे.  

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :नितीन कामथराकेश झुनझुनवालाव्यवसाय