बूटस्ट्रॅप्ड (Bootstrapped) आणि प्रॉफिटेबल स्टॉक ब्रोकिंग फर्म झिरोदानं (Zerodha) स्टार्टअप्सना मदतीचा हात देण्यासाठी १००० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय. झिरोदानं त्यांच्या स्टार्टअप एक्सीलरेटर फंड रेनमॅटरला अतिरिक्त १००० कोटी रुपयांचा निधी दिलाय. याद्वारे, झिरोदा सर्व नवीन स्टार्टअप्सना, सुरुवातीच्या टप्प्यात वेगानं पुढे जाता यावं यासाठी निधी पुरवते. झिरोदाचे सीईओ नितीन कामथ यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. "कंपनीकडून सातत्यानं गुंतवणूक जारी राहू शकते, कारण जी गुंतवणूक केली जाते, तो कंपनीचा आपला निधी असतो, कुठूनही जमा केलेला फंड नसतो," असं नितीन कामथ म्हणाले.
रेनमॅटर एक्सीलरेटर फंडाच्या मदतीनं, झिरोदा टेक्नॉलॉजी, हेल्थ, स्टोरीटेलिंग यासारख्या विविध नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना निधी देण्याचं काम करते. शुक्रवारी झिरोदानं एक ब्लॉग पोस्ट केला. ज्यामध्ये रेनमॅटरनं गेल्या ७ वर्षांत ८० पेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं सांगण्यात आलंय. आता या ब्रोकरेज फर्मनं रेनमॅटरला अतिरिक्त १००० कोटी रुपये जारी केले आहेत, जे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्समध्ये गुंतवले जातील.
२०१६ मध्ये झिरोधाने रेनमॅटर सुरू केले. फायनान्शिअल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवीन स्टार्टअप्सना पाठिंबा देणं हा त्याचा उद्देश होता. रेनमॅटर कॅपिटलनं जी काही गुंतवणूक केली आहे, त्यातून मिळणारा नफा रेनमॅटर फाऊंडेशनला पाठवला जातो.
We started @Rainmatterin in 2016 to support fintech startups working on helping people do better with their money. So far, we have invested ~ Rs 400 crores in 80 startups. In this journey, we realized that having patient Indian investors backing Indian founders is helpful. We're…
— Nithin Kamath (@Nithin0dha) August 10, 2023
काय म्हणाले कामथ
"चांगला व्यवसाय एका रात्रीत उभा करता येत नाही हे आजपर्यंतच्या प्रवासातून पाहिलंय. अशातच झिरोदा ज्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतं, ते स्टार्टअप जोपर्यंत सस्टेनेबल होत नाही तोवर त्यांच्या फाऊंडर्ससोबत आम्ही काम करतो. ही कमिटमेंट अधिक वाढवून यासाठी आणखी १००० कोटी रुपयांची तरतूद करत आहोत," असं नितीन कामथ म्हणाले.
"कंपन्यात गुंतवणूक करताना आम्ही लवकरात लवकर नफा कसा मिळवता येईल हे आम्ही पाहत नाही. ना कोणत्या फाऊंडरवर केव्हा आणि कधी एक्झिट मिळणार यावरून दबाव टाकला जातो. भारतासारख्या देशात सस्टेनेबल बिझनेस बनवण्यासाठी वेळ लागतो आणि यापद्धतीनं फाऊंडर्सना अधिक मजबूत बनवता येतं," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
झिरोदाची कहाणी
यावेळी नितीन कामथ यांनी झिरोदाची कहाणीही सांगितली. "२०१० मध्ये काम सुरू केल्यानंतर आम्हा एक चांगली संधी मिळण्यासाठी जवळपास ७ वर्षांचा मोठा कालावधी लागला. व्यवसाय जितका दीर्घ काळापर्यंत तग धरू शकतो, हळू हळू वाढत जातो, तितकाच तो यशस्वी होण्याची शक्यताही जास्त असते असं आम्ही मानतो," असंही त्यांनी नमूद केलं.