Share Market: कोविडनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, झिरोदाचे सीईओ नितीन कामथ यांनी कोरोनाच्या महासाथीनंतर भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या वाढीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. यासोबतच त्यांनी झिरोदावरील डिमॅट खात्यात किती कोटींची रक्कम आहे, याचीही माहिती दिली.
सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सनंही ७५००० चा टप्पा पार केलाय. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नितीन कामथ यांनी माहिती दिली. झिरोदाच्या ग्राहकांच्या खात्यात एकूण मिळून ४.५ लाख कोटी रुपयांची रक्कम असल्याचं नितीन कामथ म्हणाले.
डीमॅट खात्यांची संख्या वाढली
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ग्राहक मोठ्या प्रमाणात डीमॅट अकाऊंट सुरू करत आहेत. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचं याकडे स्वारस्य आणि भागीदारी वाढत आहे. याशिवाय आयपीओच्या यशानंही गुंतवणूकदारांना याकडे वळवल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
खात्यांची संख्या
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारतात ३.७ कोटी डीमॅट खाती रजिस्टर करण्यात आली होती, दरमहा सरासरी ३० लाखांहून अधिक खाती उघडली गेली. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) या दोन्ही आघाडीच्या डिपॉझिटरीसह उघडलेल्या डीमॅट खात्यांच्या संख्येत वर्षभरात ११.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ११.४५ कोटींच्या तुलनेत एकूण संख्या १५.१४ कोटींवर पोहोचलीये.