सध्या स्टार्टअप्स (Startup) आणि त्यांचे संस्थापक (Founders) यांच्यादरम्यान झालेल्या वादाच्या काही घटना समोर आल्या आहेत. या वर्षाच्या सुरूवातीलाच भारतचे आणि अशनीर ग्रोव्हर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठकला होता. आथा सिंगापूर बेस्ड स्टार्टअप झिलिंदोनं आपल्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिती बोस यांना वादानंतर कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. झिलिंगोनं यापूर्वी १२ एप्रिल रोजी अंकिती बोस यांना सस्पेंड केलं होतं.
अंकिती यांना आर्थिक गैरव्यवहारामुळे हटवण्यात आल्याचं झिलिंगोकडून सांगण्यात आलं आहे. “आर्थिक गैरव्यवहारचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका फर्मच्या तपासानंतर अंकिती बोस यांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीकडे या प्रकरणी योग्य ती कायदेशीर पर्याय वापरण्याचा पर्याय खुला आहे,” असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, यानंतर अंकितीनं एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. “एका अज्ञात व्हिसल ब्लोअरच्या तक्रारीनंतर मला हटवण्यात आलं आहे. ५१ दिवसांपासून सेवा थांबवण्यात आली होती. आता मला हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मला या आधारावर सस्पेंड करण्यात आलं होतं की क्रोलला तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मी न क्रोल किंला डिलॉइटचे रिपोर्ट पाहिले, न माझ्याकडे मागण्यात आलेले दस्तऐवज सोपवण्यासाठी आवश्यक ती वेळ देण्यात आली,” असं अंकिती यांनी म्हटलं. या प्रकरणी आपण कायदेशीर मदत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
असा वाढला वादझिलिंगो दक्षिण पूर्व आशियातील सर्वात परिचित स्टार्टअप कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून झिलिंगो, कंपनीचं संचालक मंडळ आणि अंकिती बोस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कंपनीनं अंकिती यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. तर अंकिती यांनी संचालक मंडळाविरोधात हरासमेंटची तक्रार केली आहे. या दरम्यान, त्यांना पहिल्यांदा ११ मार्च रोजी सीईओ पदावरून सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर १२ एप्रिल रोजी त्यांना कंपनीतून सस्पेंड करण्यात आलं. आता त्यांना कंपनीतूनच हटवण्यात आलं आहे.