Zilingo Ankiti Bose : झिलिंगोच्या (Zilingo) माजी सीईओ अंकिती बोस (Ankiti Bose) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. याचं कारण होतं ते म्हणजे कायदेशीर लढाई. त्यांनी आपल्या माजी बिझनेस असोसिएट्सविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. अंकिती बोस यांनीच आपल्या कंपनीला मोठ्या उंचीवर नेलं. त्यानंतर त्यांना त्याच कंपनीतून काढून टाकण्यात आलं.
अंकिती बोस या झिलिंगोच्या सहसंस्थापक आहेत. ही एक मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी आणि कमर्शिअल स्टार्टअप आहे. रिपोर्टनुसार, झिलिंगोचं २०१९ मध्ये बाजारमूल्य ७ हजार कोटी रुपये होतं. त्यांच्या या यशात अंकिती बोस यांचा मोलाचा वाटा होता. अंकिती बोस यांनी २०१८ मध्ये फोर्ब्स आशियाच्या ३० अंडर ३० या लिस्टमध्ये तर २०१९ मध्ये फॉर्च्यूनच्या ४० अंडर ४० आणि ब्लूमबर्ग ५० मध्येही स्थान मिळवलं.
कोण आहेत अंकिती बोस?
अंकिती बोस यांचा जन्म देहरादून येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील केंब्रिज स्कूलमधून झालं. अंकिती बोस यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. यानंतर अंकिती बोस यांना बंगळुरू येथील मॅकिन्से अँड कंपनी आणि सिकोइया कॅपिटलमध्ये नोकरी मिळाली. दरम्यान, वीकेंड मार्केटमध्ये फिरताना अंकिती बोस यांच्या लक्षात आलं की, अनेक स्थानिक दुकानांची ऑनलाइन उपस्थिती नाही.
यानंतर त्यांनी सिकोइया कॅपिटलमधील इनव्हेस्टमेंट अॅनालिस्ट पदाचा राजीनामा दिला आणि झिलिंगोची स्थापना केली. अंकिती बोस यांनी ध्रुव कपूरसोबत मिळून आपला व्यवसाय सुरू केला.
स्वत:च्या स्टार्टअपमधून काढलं
कंपनीला यशस्वीरित्या नव्या उंचीवर नेल्यानंतर बोस यांना २०२२ मध्ये त्यांच्याच स्टार्टअपमधून काढून टाकण्यात आलं. कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाच्या आरोपांमुळे त्यांना झिलिंगोच्या सीईओ पदावरून त्यांना निलंबित करण्यात आलं. रिपोर्टनुसार बोर्डाच्या परवानगीशिवाय त्यांनी १० पट पगारवाढ केल्याचे म्हटलं जातं. याव्यतिरिक्त, त्याच्यावर विविध विक्रेत्यांना १ कोटी डॉलर्सची देयके दिल्याचा आरोप आहे.