Join us

जे दिसतं ते खरं नाही... डिस्काऊंटवर Zomato च्या सीईओंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 3:34 PM

दीपिंदर गोयल यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर दिसणार्‍या डिस्काऊंट ऑफरबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर (Zomato) दिसणार्‍या डिस्काऊंट ऑफरबद्दल एक मोठं विधान केलं आहे. झोमॅटो प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे सवलती दिल्या जातात त्या ग्राहकांची दिशाभूल करत आहेत आणि यात आपल्याला बदल करायचा आहे, असं त्यांनी नमूद केलं.युट्यूबर रणवीर अल्लाबादियाच्या पॉडकास्ट 'द रणवीर शो' मधील चर्चेदरम्यान, दीपिंदर गोयल यांना, झोमॅटो ग्राहकांना मोठ्या सवलती कशा देते याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर गोयल म्हणाले, "सवलती फार मोठ्या नाहीत, त्या केवळ दिसतात." झोमॅटोचे संस्थापक गोयल म्हणाले की आमच्या प्लॅटफॉर्मवर ८० रुपयांपर्यंत ५० टक्के सूट अशा ऑफर चालतात. ही ५० टक्के सूट नाही, तर ही ८० रुपयांची सूट आहे. जर तुमची ऑर्डर ४०० रुपयांची असली तर सूट केवळ २० टक्के असते, असं ते म्हणाले. सवलत देण्याची ही पद्धत ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचं त्यांनी मान्य केलं.प्रामाणिक सवलत नाहीमी या सवलतीला प्रामाणिक म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ग्राहकाला काही सांगत असाल तर ते प्रामाणिक असलं पाहिजे. यामध्ये ८० रुपयांची सूट असली पाहिजे. ८० रुपयांपर्यंत ५० टक्के सूट नसावी. स्पर्धा अशीच सुरू राहिल्यास आपण काहीही बदलू शकणार नाही, अशी कबुलीही गोयल यांनी दिली.

टॅग्स :झोमॅटो