Zomato Food Rescue : तुम्ही झोमॅटोवरुन ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता आणखी स्वस्त अन्न मिळणार आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने एक नवीन फीचर आणले आहे. त्याचे नाव आहे- फूड रेस्क्यू (Food Rescue). नवीन फीचरच्या मदतीने अन्नाची नासाडी कमी करण्यात मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे. या सेवेच्या मदतीने वापरकर्ते रद्द केलेल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर कमी किमतीत बुक करू शकतात.
काय आहे नवीन योजना?
झोमॅटो कंपनीचे सह-संस्थापक दीपंदर गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी माहिती दिली आहे. ऑर्डर रद्द केल्यास कठोर नियम आणि नो-रिफंड धोरण असूनही, विविध कारणांमुळे ग्राहकांकडून ४ लाख ऑर्डर रद्द केल्या जातात. हे आमच्यासाठी, रेस्टॉरंट उद्योगासाठी आणि अन्नाची नासाडी रोखू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी चिंतेचे कारण आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही अन्न बचाव उपक्रम सुरू करत आहोत.
दर महिन्याला 4 लाख ऑर्डर रद्द
झोमॅटोच्या मते, दर महिन्याला सुमारे ४ लाख ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गावर असताना रद्द केल्या जातात. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे एक गंभीर आव्हान असून अन्नाची अशी नासाडी रोखण्यासाठी कंपनी सर्व प्रकारच्या उपायांवर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर झोमॅटोने अन्न बचाव उपक्रम सुरू केला आहे.
अन्नाची नासाडी थांबणार?
फूड रेस्क्यू अंतर्गत, ऑर्डर रद्द केल्यावर, डिलिव्हरी पार्टनरच्या ३ किमी क्षेत्रात असलेल्या ग्राहकांसाठी अॅपवर नोटीफिकेशन पाठवले जाईल. अन्न ताजे राहील याची खात्री करण्यासाठी, या ऑर्डरवर दावा करण्याचा पर्याय काही मिनिटांसाठी उपलब्ध असेल. मूळ ग्राहक ज्याने ऑनलाइन अन्न ऑर्डर केले होते आणि त्याच्या आसपास राहणारे लोक या ऑर्डरवर दावा करू शकणार नाहीत. नवीन ग्राहकाने केलेले पेमेंट रेस्टॉरंट पार्टनर आणि मूळ ग्राहकाने ऑनलाइन पेमेंट केले असल्यास शेअर केले जाईल. झोमॅटो सरकारी टॅक्सशिवाय कुठलेही शुल्क आकारणार नाही. अन्न बचाव मोहिमेत आइस्क्रीम, शेक किंवा इतर नाशवंत वस्तूंचा समावेश नसेल. डिलिव्हरी पार्टनरला संपूर्ण ट्रिपसाठी पैसे दिले जातील.