Join us

पैशांचा चुराडा! ‘या’ ४ कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे १.३० लाख कोटी बुडविले; Zomato, Paytm आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 6:11 PM

उत्साहात शेअर मार्केटमध्ये पदार्पण केलेल्या कंपन्यांमुळे गुंतवणूकदार मात्र चांगलेच होरपळून निघाल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: शेअर मार्केटमध्ये चढ-उताराचा सिलसिला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अत्यंत उत्साहाने अनेक कंपन्यांनी शेअर बाजारात आयपीओ सादर केले. मात्र, हजारो गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा आली. यातील अनेक कंपन्यांनी आपली सुरुवात स्टार्टअप म्हणून केली होती. या कंपन्यांच फ्लॉप झालेले आयपीओंमुळे आता नवीन स्टार्टअपमधून बड्या झालेल्या कंपन्या आयपीओ सादर करण्यास धजावत नसल्याचे सांगितले जात आहे. Zomato, Paytm यांसह ४ कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे १.३० लाख कोटी बुडल्याचे सांगितले जात आहे. 

पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स १८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. पहिल्या दिवशी व्यवसाय बंद झाल्यानंतर या कंपनीचा मार्केट कॅप १,०१,३९९.७२ कोटी रुपये होता. आताच्या घडीला तो ५५,८०० कोटी रुपयांवर घसरला आहे. अशा प्रकारे पेटीएमच्या गुंतवणूकदारांचे पहिल्या दिवसापासून सुमारे ४५,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Zomato मुळेही मोठे नुकसान

त्याचप्रमाणे, २३ जुलै २०२१ रोजी लिस्टिंगच्या दिवशी बाजार बंद झाल्यावर Zomato चा मार्केट कॅप ९८,७३१.५९ कोटी रुपये होता. बुधवारी त्याचा एमकॅप ६६,८७२ कोटी रुपयांपर्यंत खाली आला. पहिल्या दिवसापासून या कंपनीच्या गुंतवणूकदारांचे सुमारे ३१ हजार ८६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जर तुम्ही फक्त पेटीएम आणि झोमॅटोचे आकडे बघितले, तर लिस्टिंग झाल्यापासून गुंतवणूकदारांचे तब्बल ७७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पॉलिसी बाझार आणि Nykaa चाही IPO फ्लॉप

पॉलिसी बाझार आणि Nykaa च्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, या दोन्ही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कंगाल केले. Nykaa ची मूळ कंपनी FSN १० नोव्हेंबर २०२१ रोजी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली होती आणि त्या दिवशी बाजार बंद झाल्यानंतर तिचा मार्केट कॅप १,०४,३६०.८५ कोटी रुपये होता. बुधवारी व्यवसाय बंद झाल्यानंतर तो ७१,३०८.५५ कोटी रुपयांपर्यंत खाली आला होता. आतापर्यंत या समभागाने गुंतवणूकदारांचे सुमारे ३३ हजार कोटींचे नुकसान केले आहे.

दरम्यान, या घडामोडींनंतर स्टार्टअप कंपनी असून, हॉटेल चेन क्षेत्रात चांगलाच जम बसवणाऱ्या ओयो कंपनीसह डेलिव्हरी कंपनीने आपला आयपीओ सादर करण्याचा विचार पुढे ढकलला आहे. आता पुढील वित्त वर्षात या दोन्ही कंपन्यांचे आयपीओ सादर केले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगझोमॅटोपे-टीएम