Join us

घसरत्या बाजारात Zomato ची उंच उडी, दीपिंदर गोयल मालामाल; एका झटक्यात कमावले १६०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 1:44 PM

शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण होत असताना फूड एग्रीगेटर झोमॅटोच्या शेअरनं मात्र उच्चांक गाठला. शुक्रवारी झोमॅटोचे शेअर्स उच्चांकी स्तरावर पोहोचले.

शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण होत असताना फूड एग्रीगेटर झोमॅटोच्या शेअरनं मात्र उच्चांक गाठला. जून तिमाहीतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कंपनीचा शेअर जवळपास १९ टक्क्यांनी वधारून २७८.४५ रुपयांवर पोहोचला. त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅपही वाढून २.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

या तेजीमुळे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी दीपिंदर गोयल यांची लॉटरी लागलीये. काही तासांतच त्यांच्या संपत्तीत सुमारे १६०० कोटी रुपयांची वाढ झाली. मागील सत्रात कंपनीचा शेअर २३४.१० रुपयांवर बंद झाला होता. परदेशी ब्रोकरेज फर्म सीएलएसएनं झोमॅटोचं टार्गेट प्राइस वाढवून ३५० रुपये केलं असून शेअरला बाय रेटिंग दिलं आहे.

नेटवर्थ १.७ अब्ज डॉलर्सवर

फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनियर लिस्टनुसार दीपिंदर गोयल यांची नेटवर्थ १.७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. झोमॅटोमध्ये त्यांचा ४.१९ टक्के हिस्सा आहे. या रॅलीमुळे त्यांच्या तिजोरीत १,६३८ कोटी रुपये आले. अशा प्रकारे कंपनीतील त्यांच्या शेअर्सचं मूल्य १०,२८८ कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फो एज (इंडिया) चाही या कंपनीत हिस्सा आहे. त्यांच्याकडे झोमॅटोचे १,१९,४६,८७,०९५ इक्विटी शेअर्स आहेत, ज्याची किंमत सुमारे ३३,२६५ कोटी रुपये आहे. कंपनीने गुरुवारी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीचा नफा १२,६५० टक्क्यांनी वाढून २५३ कोटी रुपये झाला आहे. या काळात कंपनीचा महसूलही ७५ टक्क्यांनी वाढून ४,२०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

काय आहे टार्गेट प्राईज?

या तिमाही निकालानंतर अनेक रेटिंग एजन्सींनी झोमॅटोच्या शेअरला अपग्रेड केलंय. परदेशी ब्रोकरेज फर्म सीएलएसएने सांगितलं की, ब्लिंकिटच्या नफ्यातही सुधारणा झाली आहे. कंपनीने झोमॅटोला ३५० रुपयांच्या टार्गेट प्राइससह शेअरवर 'बाय' रेटिंग दिले. जेएम फायनान्शियल, यूबीएस, सिटी आणि गोल्डमन सॅक्स यांनीही झोमॅटोच्या शेअरवर बाय रेटिंग देत २६० ते २८० रुपयांचं टार्गेट प्राइस दिलं आहे. त्याचप्रमाणे बर्नस्टीन आणि मॉर्गन स्टॅनली यांनी कंपनीला आउटपरफॉर्मचा टॅग दिला आहे. परंतु मॅक्वेरीने त्याला अंडरपरफॉर्म टॅग दिला आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजार