नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच मोठा गाजावाजा करून दाखल झालेल्या काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांची घोर निराशा केल्याचे पाहायला मिळाले. यात आता एलआयसीचा समावेश झाला आहे. मात्र, बाजाराच्या प्रतिकूल परिस्थिती झोमॅटो कंपनीचे (Zomato) नशीब फळफळले असून, शेअर लिस्टिंग झाल्याच्या तब्बल १० महिन्यानंतर झोमॅटो कंपनीचा शेअर्स वधारले आहेत. झोमॅटोचा शेअर तब्बल १९ टक्क्यांनी वाढला असून, या शेअरने थेट अप्पर सर्किटमध्ये झेप घेतली.
जुलै २०२१ मध्ये झोमॅटोने शेअर बाजारात पदार्पण केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच झोमॅटोचा शेअर अप्पर सर्किटमध्ये झेपावला. या तेजीने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. फूड डिलीव्हरी स्टार्टअप असलेल्या झोमॅटोने गुंतवणूकदारांना सुखद धक्का असून, मार्चच्या तिमाहीत कंपनीच्या तोट्यामध्ये प्रचंड वाढ झाली असली, तरी महसुलातील भक्कम वाढीमुळे सकारात्मक पडसाद शेअरवर दिसून आले.
चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर
झोमॅटोने चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. त्यात कंपनीला ३५९ कोटींचा तोटा झाला. त्याआधीच्या वर्षातील याच तिमाहीत कंपनीला १३४ कोटींचा तोटा झाला होता. या तिमाहीत कंपनीला १,२१२ कोटींचा महसूल मिळाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६९२ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा महसुलात ७५ टक्के घसघशीत वाढ झाली. तोटा वाढला असला तरी शेअरला मात्र फायदा झाला.
दरम्यान, सुरुवातीच्या सत्रात झोमॅटो १९ टक्क्यांनी वधारला आणि तो ६७.६ रुपयांपर्यंत गेला होता. या तेजीने कंपनीचे बाजार भांडवल ५०,००० कोटींवर गेले. जुलै २०२१ पासून झोमॅटोच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होताना दिसली. काही दिवसांपूर्वी या शेअरने आयपीओची किंमत पातळी गाठली होती.