नवी दिल्ली : झोमॅटोसाठी (Zomato) एक वाईट बातमी आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) झोमॅटोविरोधात चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, 21 फेब्रुवारी झी बिझनेसने अहवाल दिला की नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने उच्च कमिशन आकारल्याबद्दल आणि ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याबद्दल झोमॅटो विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोगकडे (CCI) तक्रार केली होती.
याची दखल घेत भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) आघाडीच्या खाद्यपदार्थ वितरण कंपन्यांच्या स्विगी आणि झोमॅटोविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय स्पर्धा आयोगाने या कंपन्यांच्या ऑपरेशन्स आणि बिझनेस मॉडेलच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, आयोगाने स्पर्धा कायद्याच्या कलम ३(१) आणि ३(४) चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
भारतीय स्पर्धा आयोगाने 4 एप्रिल 2022 रोजी आदेशाची प्रत जारी करताना म्हटले आहे की, 'प्रामुख्याने झोमॅटो आणि स्विगीचे काही वर्तन पाहता, त्यांच्या विरोधात महासंचालकद्वारे (DG) चौकशी आवश्यक वाटते. या कंपन्यांचे वर्तन स्पर्धा कायद्याच्या कलम ३(१) आणि ३(४) चे उल्लंघन करते की नाही हे तपासाद्वारे शोधले जाऊ शकते. स्पर्धा कायद्याच्या कलम २६(१) च्या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश आयोगाने महासंचालकांना दिले आहेत. एवढेच नाही तर आयोगाने हा आदेश मिळाल्यानंतर ६० दिवसांच्या आत तपासाचा अहवाल महासंचालकांना सादर करण्यास सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?विशेष म्हणजे नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) तक्रारीवरून या दोन कंपन्यांविरोधात चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने आरोप केला आहे की, भारताच्या अन्न वितरण उद्योगात 90 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेचा वाटा असलेले समूह भारताच्या स्पर्धा कायद्याचे मोठ्या प्रमाणात सवलत, विशेष टाय-अप आणि विशिष्ट रेस्टॉरंट भागीदारांना प्राधान्य देऊन उल्लंघन करत आहेत. याचा परिणाम रेस्टॉरंटच्या व्यवसायावरही होत असून नवीन रेस्टॉरंट प्लेयर्सना उद्योगात येण्याची संधी कमी मिळत आहे.
यानंतर भारतीय स्पर्धा आयोगाने याची तात्काळ दखल घेत शनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितलेल्या काही गोष्टींची चौकशी करण्यात यावी, असे सांगितले. या दोन्ही कंपन्यांवर विलंबित पेमेंट सायकल, करारातील एकतर्फी कलमे, भरपूर कमिशन आकारणे असे आरोप शनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने केले आहेत.