Join us

Zomato आता नाव बदलणार?, जाणून घ्या व्यवसायातही काय होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 3:00 PM

सध्या कंपनीकडे एकूण चार ब्रँड्स आहेत. एप्रिल जून २०२२ या तिमाहित झोमॅटोचा कन्सोलिडेट तोटा वाढून १८५.७ कोटी रूपये झाला आहे. 

सध्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत Zomato साठी थोडी दिलासादायक बाब समोर आली असून त्यांचा तोटा कमी झाला आहे. आता कंपनी तिच्या नेतृत्वाच्या स्ट्रक्चरसह अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याच्या योजनेवर काम करत आहे. झोमॅटोचे व्यवस्थापन लवकरच पॅरेंट कंपनी बनवू शकते अशी माहिती समोर येत आहे. अलीकडेच, झोमॅटोने ब्लिंकिटच्या अधिग्रहणास मान्यता दिली. कंपनी आता आपला प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी निरनिराळ्या सीईओंची नियुक्ती करण्याचाही विचार करत आहे. सध्या झोमॅटोचे एकूण चार ब्रँड आहेत. यामुळे पॅरेंट कंपनी बनवून ते सर्व ऑपरेट करण्याचा विचार करत आहे.

आपण एक कंपनी तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहोत, ज्या ठिकाणी प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी निरनिराळे सीईओ असतील. सर्वजण एकमेकांसोबत काम करतील, असे झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी म्हटल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. दीपंदर गोयल मूळ कंपनीला रिब्रँड करू शकतात आणि तिला 'इटर्नल' नाव असंही नाव देऊ शकतात. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

सध्या कंपनीकडे झोमॅटो, ब्लिंकिट, हायप्योअर, फिडिंग इंडिया असे चार ब्रँड्स आहेत. परंतु आता गोयल या सर्व कंपन्यांना एका पॅरेंट कंपनीखाली आणून ऑपरेट करण्याच्या विचारात आहेत. ‘इटरनल’ हे सध्या इंटरनल नाव राहिल, झोमॅटोचं सध्या नाव बदलणार नाही, असंही स्टार्टअपच्या सीईओंनी सांगितलं. दरम्यान, एप्रिल जून २०२२ या तिमाहित झोमॅटोचा कन्सोलिडेट तोटा वाढून १८५.७ कोटी रूपये झाला आहे. 

टॅग्स :झोमॅटोव्यवसाय