लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या शाही प्री-वेडिंग सोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. अनंत यांचे लग्न जुलैमध्ये आहे, पण लग्नाशी संबंधित तीन दिवसांचे कार्यक्रम १ मार्चपासून सुरू होतील. गुजरातमधील जामनगर येथे होणाऱ्या या प्री-वेडिंग सोहळ्यात बडे उद्योगपती, अख्खे बॉलीवुड अन् क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे.
पाहुण्यांत उद्योगपती गौतम अदानी आणि सुनील भारती मित्तल यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
भारतीय उद्योजक कोणते येणार?
भारतीय उद्योगजगतातील दिग्गज गौतम अदानी आणि कुटुंब, टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंदशेखरन, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंब, गोदरेज कुटुंब, इन्फोसिसचे प्रमुख नंदन निलेकणी, आरपीएसजी समूहाचे प्रमुख संजीव गोयंका, विप्रोचे ऋषट प्रेमजी, बँकर उदय कोटक यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला, एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल, हिरोचे पवन मुंजाल, एचसीएलचे रोशनी नाडर, झरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत, उद्योजक रॉनी स्कूवाला आणि सन फार्माचे दिलीप सांधी यांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
राहण्यासाठी अति-आलिशान तंबू मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या तीन मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या अनंत अंबानी यांचे लग्न राधिका मर्चटसोबत होणार आहे. राधिका ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चट आणि उद्योजिका शैला मर्चट यांची धाकटी मुलगी आहे.•जामनगरमध्ये पंचताराकित हॉटेल नसल्यामुळे, अतिथींसाठी टाइल्स असलेल्या बाथरूमसह सर्वेत्तम सुविधा असलेले अति-आलिशान तंबू बांधले जात आहेत.
जगभरातून कोण येणार?सूत्रांनी सागितले की, अतिथींच्या यादीत मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, अॅडोबचे सीईओ शांतनु नारायण, वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, अॅडनोकचे सीईओ सुलतान अहमद यांचाही समावेश आहे.
बॉलीवूडमधून कोण येणार?बॉलीवूडमधून अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान आणि कुटुंब, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि द्विकल खन्ना, अजय देवगण आणि काजोल, सैफ अली खान आणि कुटुंब, चंकी पांडे, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आणि विकी कौशल आणि कतरिना कैफ उपस्थित राहणार आहेत. याच्यासह या यादीत माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने, आदित्य आणि राणी चोप्रा, करण जोहर, बोनी कपूर आणि कुटुंब, अनिल कपूर आणि कुटुंब, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि करिश्मा कपूर, रजनीकांत आणि कुटुंब यांचाही समावेश आहे.
क्रिकेटपटू कोण येणार?निमंत्रितांच्या यादीत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्यांचे कुटुंब, एमएस धोनी आणि कुटुंब, रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक, कुणाल पंड्या आणि इशान किशन याच्या नावाचाही समावेश आहे.
दिलजीत करणार मनोरंजननिमंत्रितांना पाठविलेल्या 'इव्हेंट गाईड'नुसार, तीन दिवसांचे कार्यक्रम थीमवर आधारित असतील. पाहुण्यांना दिल्ली आणि मुंबईहून जामनगरला येण्यासाठी आणि जाण्यासाठी खास चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. १ मार्च रोजी दुपारपर्यंत पाहुणे येणे अपेक्षित आहे. दिलजीत दोसांज, हॉलिवूड पॉप-आयकॉन रिहाना आणि इतर कलाकार या कार्यक्रमांमध्ये आपल्या परफॉर्मन्सने पाहुण्यांचे मनोरंजन करतील.