लोकमत न्यूज नेटवर्क , नवी दिल्ली : भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने आकार घेत आहे. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे मजबूत जाळे देशात उभे राहिले आहे. यामुळे देशात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने करणे शक्य झाल्याने लोकांनी कॅश बाळगणे कमी केले आहे. परिणामी एटीएमची संख्या घटल्याचे दिसते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएमच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती. वर्षभरात सप्टेंबर २०२४ ही संख्या घटून २,१५,००० वर आली आहे. या शिवाय शहरांमध्येही कमी ग्राहक असलेली एटीएम बंद करावी लागली आहेत किंवा त्यांच्या जागा बदलल्या आहेत. यूपीआयची लोकप्रियता वाढल्याने एटीएमचा वापर कमी होत असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.
आरबीआयने लागू केलेल्या निर्बंधांचाही फटका
२०२२ या आर्थिक वर्षात देवाणघेवाणीचे ८९ टक्के व्यवहार रोखीत झाले. कोविड साथीनंतर सरकारने कमी रोकड व डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे धोरण स्वीकारले.
आरबीआयकडूनही एटीएम वापरावर शुल्क तसेच इतर बँकांचे एटीएम वापर शुल्क वाढवले. मोफत व्यवहारांवर मर्यादा आणली. यामुळेही एटीएमचा वापर कमी होत गेला आहे.
ऑफ-साइट एटीएम बंद
मुख्यत्वे ऑफ-साईट म्हणजेच लोकवस्तीपासून दूर असलेल्या एटीएमच्या संख्येत घट झाल्याने दिसत आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये ऑफ-साईट एटीएमची संख्या ९७,०७२ इतकी होती. वर्षभरात ही संख्या घटून ८७,६३८ वर आली आहे. येणारे ग्राहक घटल्याने ही एटीएम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.