नवी दिल्लीः आरबीआयच्या निर्देशानुसार एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी बँकांनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कॅनरा बँकेच्या कार्डानं 10 हजार रुपयांहून अधिकची रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढल्यास आपल्याला आता पिन नंबरबरोबरच मोबाइल नंबरमध्ये आलेला OTP(वन टाइम पासवर्ड) द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता कॅनरा बँकेच्या एखाद्या ग्राहकानं एटीएममधून 10 हजारांहून अधिकची रक्कम काढल्यास त्याला पिन नंबरबरोबरच ओटीपी द्यावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इतर बँकाही कॅनरा बँकेचं अनुकरण करू शकतात. एटीएममधून 10 हजार रुपयांहून जास्तीची रक्कम काढल्यास ओटीपी अनिवार्य करतील. आरबीआयच्या निर्देशांचं सर्वच बँकांना पालन करावं लागणार आहे. एटीएमची फसवणूक रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत जास्त होते. तत्पूर्वी एटीएम फसवणूक प्रकरणात दिल्लीतल्या राष्ट्रीय स्तरावरील बँकर्स कमिटी(SLBC)नं काही उपाय सुचवले होते. कमिटीनं दोन एटीएम व्यवहारांमध्ये 6 ते 12 तासांचा वेळ ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता.
- देशात वाढले एटीएम फसवणुकीची प्रकरणं
वर्षं 2018-19मध्ये दिल्लीत 179 एटीएम फसवणुकीचे प्रकार दाखल झाले आहेत. या फसवणुकीच्या प्रकरणात महाराष्ट्रही मागे नाही. या महिन्यात कार्ड क्लोनिंगचे प्रकारही समोर आले आहेत. ज्यात मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांचा समावेस आहे. वर्षं 2018-19मध्ये देशभरात फसवणुकीचे प्रकार 980 झाले आहेत.