oyo ritesh agarwal : हॉटेलिंगची माहिती असलेल्या व्यक्तीला 'ओयो' माहिती नाही, असा माणूस दुर्मिळच म्हणावा लागेल. तरुणांमध्ये तर ओयो जरा जास्तच लोकप्रिय आहे, मग कारण काहीही असुदेत. अलीकडच्या काळात ओयो हॉटेल कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. कधी आधार कार्डद्वारे बुकिंग असो किंवा काही शहरांमध्ये जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी. पण, सध्या एका मोठ्या प्रकरणात ओयो कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. ओयोवर बनावट बुकिंगच्या नावाखाली पैसे कमावल्याचा आरोप आहे. कंपनीचे मालक रितेश अग्रवाल यांच्याविरुद्ध २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
ओयो आणि संस्कार रिसॉर्ट यांच्यातील सुरू असलेल्या जीएसटी वादात राजस्थान उच्च न्यायालयाने एक मोठा निकाल दिला आहे. ओयोला जबरदस्तीच्या कारवाईपासून तात्पुरती सवलत दिली आहे. न्यायालयाने संस्कार रिसॉर्टचे संचालक मदन जैन यांनाही नोटीस बजावली आहे. हे प्रकरण २.६६ कोटी रुपयांच्या जीएसटी देयकाशी संबंधित आहे, ज्यामध्ये न्यायालयाने तक्रारदाराने दिलेली माहिती दिशाभूल करणारी आणि अपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
ओयोने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रवीर भटनागर म्हणाले की, रिसॉर्टने प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती जसे की चेक-आउट रेकॉर्ड, ऑपरेशनल कराराची प्रत आणि बंद खोल्यांचे तपशील दिलेले नाहीत, जे खटल्यासाठी आवश्यक होते. न्यायालयाने म्हटले की, तक्रारदार जाणूनबुजून कराशी संबंधित सत्य लपवू इच्छित असल्याचे दिसून येते.
सीईओ रितेश अग्रवाल यांच्या दाखल झाला होता गुन्हा
ओयोने संस्कार रिसॉर्टने दाखल केलेला एफआयआर बनावट आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी केली होती. एफआयआरला स्थगिती देताना न्यायालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण कर दायित्वापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. पोलिसांना दोन आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ओयोकडून रिसॉर्ट मालकाविरोधात मानहानीचा दावा
ओयोचे वकील आर. बी. माथूर आणि लिपी गर्ग यांनी न्यायालयाला सांगितले की, कंपनीचा संस्कार रिसॉर्टशी आता कोणताही व्यावसायिक संबंध नाही. रिसॉर्टमधील अनेक बुकिंग 'वॉक-इन' होत्या, कदाचित हॉटेल कर्मचाऱ्यांनी थेट नोंदवल्या असतील. आम्ही संबंधित एजन्सींना सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच सादर केली असल्याचे ओयोने म्हटलं आहे. यासोबतच, ओयोने संस्कार रिसॉर्टचे संचालक मदन सिंह जैन यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीची कारवाई सुरू केली आहे.
वाचा - ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल; रूम बुकिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप
संस्कार रिसॉर्टची दिवाणी याचिका फेटाळली
यापूर्वी, संस्कार रिसॉर्टने जयपूर उच्च न्यायालयात एक दिवाणी याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळून लावत म्हटले होते की, इनव्हॉइस जारी करण्याची जबाबदारी रिसॉर्टची आहे, ओयोची नाही. न्यायालयाने म्हटलं, की ओयो हा केवळ एक प्लॅटफॉर्म आहे. त्यांची भूमिका केवळ सेवा आणि कमिशनपुरती मर्यादित आहे. पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार आहे. आम्ही सर्व तपास संस्थांना सहकार्य करत असून पुढेही करत राहू, असं ओयोने म्हटलं आहे.