Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. याचा पहिला धक्का म्हणजे सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यानंतर आता पाकिस्तानला मोठा महसूल देणारी भारत आणि पाकिस्तानमधील अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आणि ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अनेक उच्च सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की भारत आता पाकिस्तानला होणाऱ्या वस्तूंची निर्यात थांबवण्याची तयारी करत आहे. २०२४ मध्ये भारताची पाकिस्तानला होणारी निर्यात १.२१ अब्ज डॉलर्सच्या पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली होती.
भारत पाकिस्तानला कोणत्या वस्तूंची निर्यात करतो?
भारतातून पाकिस्तानला अनेक प्रकारचे अन्नपदार्थ निर्यात केले जातात, जे दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत जसे की विविध प्रकारची फळे आणि भाज्या. यामध्ये बटाटे, कांदे आणि लसूण यांचा समावेश आहे. भारतातून पाकिस्तानला डाळी, हरभरा आणि बासमती तांदूळ देखील पाठवले जाते. याशिवाय, पाकिस्तान भारतातून आंबा, केळी यांसारखी अनेक हंगामी फळे आयात करतो. भारतीय चहा जगभर प्रसिद्ध आहे. आसाम आणि दार्जिलिंगमधून सुगंधी चहाची पानेही पाकिस्तानला पाठवली जातात. याशिवाय, भारत पाकिस्तानला मिरची, हळद, जिरे असे विविध प्रकारचे मसाले पाठवतो. यासोबतच, भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधे, साखर आणि मिठाई यांचा समावेश आहे.
पाकिस्तानकडून भारत काय घेतो?
पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये सिमेंट, रॉक मीठ, मुलतानी माती, कापूस, चामडे, काही वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. याशिवाय, पेशावरी चप्पल आणि लाहोरी कुर्ते देखील पाकिस्तानमधून भारतात आयात केले जातात.
पाकिस्तानकडे जाणारा एकमेव व्यापार मार्ग बंद?
पाकिस्तान आणि भारत यांना जोडणार एकमेव व्यापारी मार्ग सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृतसरपासून फक्त २८ किलोमीटर अंतरावर असलेले अटारी हे भारतातील पहिले भू-बंदर आहे. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार अटारी-वाघा सीमेवरून होतो, त्यामुळे १२० एकरांवर पसरलेला आणि राष्ट्रीय महामार्ग-१ शी थेट जोडलेला हा चेक पॉइंट व्यापारात, विशेषतः अफगाणिस्तानातून होणाऱ्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापारात अनेक चढ-उतार आले आहेत. जिथे २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये व्यापार सुमारे ४१००-४३०० कोटी रुपयांचा होता. तो, २०१९-२० मध्ये २७७२ कोटी रुपयांवर आणि २०२०-२१ मध्ये २६३९ कोटी रुपयांवर खाली आला होता.
वाचा - पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
२०२२-२३ मध्ये, व्यापार आणखी घसरला आणि फक्त २२५७.५५ कोटी रुपयांवर राहिला. दरम्यान, २०२३-२४ मध्ये मोठी झेप घेत, दोन्ही देशांमधील व्यापार ३८८६ कोटी रुपयांपर्यंत वाढला. २०२३-२४ मध्ये, या मार्गावरून ६,८७१ ट्रक प्रवास करत होते आणि ७१,५६३ प्रवाशांची ये-जा झाली.