पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. अनेकदा पेन्शन लेट येते, बँका यासाठी बऱ्याचदा कारणीभूत असतात. आता यापुढे जर तुम्हाला पेन्शन लेट मिळाली तर जबाबदार बँकेला वार्षिक ८ टक्के दराने व्याज नुकसान भरपाई पोटी द्यावे लागणार आहे. आरबीआयने नवा नियम जारी केला आहे. पेन्शनधारकांना होत असलेल्या नुकसानीची भरपाई आता बँकांना करावी लागणार आहे.
पेन्शनच्या देय तारखेनंतर पेन्शन किंवा थकबाकी जमा करण्यास विलंब झाल्यास दरवर्षी ८ टक्के निश्चित व्याजदराने भरपाई द्यावी लागेल, असे आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. यासाठी पेन्शनधारकांकडून कोणत्याही दाव्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पेन्शन देयकाच्या तारखेनंतर झालेल्या कोणत्याही विलंबाची भरपाई ही ८ टक्के वार्षिक व्याजदराने केली जाणार आहे.
ज्या दिवशी बँक सुधारित पेन्शन किंवा पेन्शन थकबाकीची प्रक्रिया करेल त्याच दिवशी पेन्शनधारकाच्या खात्यात व्याज जमा केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे व्याज १ ऑक्टोबर २००८ पासून सर्व विलंबित असलेल्या सर्व पेन्शनवर लागू होणार आहे. पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या पेन्शनमध्ये या सर्व प्रलंबित व्याजाची भरपाई केली जाणार आहे. यासाठी आरबीआयच्या कोणत्याही सूचनांची वाट पाहू नका, असे आदेश आरबीआयने बँकांना काढले आहेत.
अनेकदा पेन्शनधारकांना पेन्शन आली की नाही हे पाहण्यासाठी बँकांचे उंबरे झिजवावे लागत असतात. पेन्शनधारक वृद्ध असतात, तसेच टेक्वोसेव्ही नसतात. यामुळे त्यांना इंटरनेट बँकिंग किंवा एसएमएस सारख्या सुविधांबाबत फारसे ज्ञान नसते. पुरुष पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळते, परंतू अनेकदा ती साक्षर नसते किंवा तिला यातील काही माहिती नसते. यामुळे या पेन्शनधारकांना नाहक त्रास होतो. अनेकदा बँक कर्मचारी देखील आज नको उद्या या असे सांगत असतात. यावर आता बँकेला भरपाई द्यावी लागणार आहे.