नवी दिल्ली : सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर या इंधन दरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची कपात झाली आहे. या स्वस्ताईचा फायदा सामान्य माणसाला मिळू शकेल, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
‘आयआयएफएल सिक्युरिटीज’चे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे तेलाची मागणी कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. मागील एक ते दीड आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्के घसरण नोंदवली गेली आहे. मागणी कमकुवत झाल्यास किमती आणखी खाली येऊ शकतात. अनुज गुप्ता म्हणाले की, कच्च्या तेलाच्या दरात अशीच घसरण होत राहिली, तर सर्वसामान्यांना याचा फायदा मिळू शकेल. तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी कपात करू शकतात.