PhonePe IPO: भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपेनं आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं आहे आणि स्वत:ला प्रायव्हेट लिमिटेडकडून पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित केलं आहे. कंपनीनं ३ एप्रिल २०२५ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत या बदलाला मंजुरी दिली, अशी माहिती रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) समोर सादर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
कंपनीनं आपलं नावही बदललं असून आता ती कंपनी 'फोनपे लिमिटेड' या नावानं ओळखली जाणार आहे. मात्र, हा बदल सध्या कंपनीच्या सदस्यांच्या विशेष ठरावाच्या आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरच्या मंजुरीच्या अधीन आहे. फोनपेचं हे धोरणात्मक पाऊल शेअर बाजारात लिस्टिंगच्या तयारीचा एक भाग आहे. वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी २० फेब्रुवारी रोजी कंपनी आयपीओच्या दिशेनं वाटचाल करत असल्याची पुष्टी केली.
२०२२ मध्ये कंपनीला आपली नोंदणी सिंगापूरहून भारतात ट्रान्सफर करावी लागली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सुमारे ८,००० कोटी रुपयांचा कर भरावा लागला. त्यानंतर कंपनीनं विमा, इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आणि डिस्ट्रिब्युशन यासारख्या आपल्या व्यवसाय वर्टिकल्सचे स्वतंत्र उपकंपन्यांमध्ये रूपांतर केलं. फोनपेचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये, एनपीसीआयनं प्रस्तावित केलेल्या यूपीआय अॅप्सवरील ३०% मार्केट शेअर कॅपमुळे आयपीओला उशीर झाला. मात्र, आता ही मुदत डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्याने फोनपेला काहीसा दिलासा मिळाल्याचं म्हटलं.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये फोनपेचा ऑपरेटिंग महसूल ७४ टक्क्यांनी वाढून ५,०६४ कोटी रुपये झाला आहे, तर निव्वळ तोटा २९ टक्क्यांनी घटून १,९९६ कोटी रुपये झाला आहे. मार्च २०२५ पर्यंत, फोनपेचा भारतीय यूपीआय बाजारपेठेत ४८% वाटा आहे, ज्यामुळे तो देशातील सर्वात मोठा यूपीआय प्लेयर बनला आहे. या आठवड्यात रेझरपेनंदेखील पब्लिक लिमिटेड बनण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे, ज्यामुळे भारतातील डिजिटल पेमेंट कंपन्या आता आयपीओच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)