राकेश झुनझुनवाला हे नाव शेअर बाजारात रस असणाऱ्यांच्या परिचयाचं आहे. झुनझुनवाला नेमके कोणते शेअर्स विकत घेतात, कुठले शेअर्स विकतात, याची माहिती घेऊन निर्णय घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित स्कॅम १९९२ ही वेबसीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर स्कॅम १९९२ ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही ही सीरिज पाहिली असल्यास तुम्हाला झुनझुनवाला यांचं नाव माहीत असेल.
शेअर बाजारातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार ही राकेश झुनझुनवाला यांची ओळख आहे. शेअर बाजारातून रग्गड कमाई करण्याचं स्वप्न हर्षद मेहतानं पाहिलं. ते काही प्रमाणात यशस्वीदेखील ठरलं. मात्र घोटाळा उघडकीस आला आणि हर्षद मेहता तुरुंगात गेला. मात्र राकेश झुनझुनवाला शेअर बाजारातले 'बिग बुल' ठरले. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हटलं जातं. फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचा ५४ वा क्रमांक आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला. देशांच्या अर्थव्यवस्था रुळावरून घसरल्या. कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. मात्र याच कालावधीत झुनझुनवाला यांनी १ हजार ४०० कोटी रुपये कमावले.
झुनझुनवाला यांचे वडील आयकर अधिकारी होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात राकेश झुनझुनवाला यांचा जन्म झाला. महाविद्यालयात असतानाच त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५० च्या आसपास असताना त्यांनी गुंतवणुकीत लक्ष घातलं. आजच्या घडीला हाच निर्देशांक ४० हजारांच्या घरात आहे. यावरून झुनझुनवाला यांच्याकडे किती मोठा अनुभव आहे, याचा अंदाज लावता येईल.
१९८६ ते १९८९ या कालावधीत झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून २० ते २५ लाखांची कमाई केली. तेव्हापर्यंत इतकी कमाई कोणलाही जमलेली नव्हती. हर्षद मेहता प्रकरण उजेडात आल्यानंतर झुनझुनवाला यांनी राधाकृष्ण दमानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड कमाई केली. हर्षद मेहताच्या अटकेमुळे शेअर बाजारात एक मोठी आर्थिक पोकळी निर्माण झाली. ती झुनझुनवाला यांनी भरून काढली.
गेल्या काही वर्षांपासून झुनझुनवाला यांनी टायटन, क्रिसिल, सेसा गोवा, प्राज इंडस्ट्रिज, ऑरोबिंदो फार्मा, एनसीसीमध्ये गुंतवणूक केली आणि देशातले सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार ठरले. रेअर इंटरप्रायझेस नावाची स्टॉक ट्रेडिंग फर्म चालवणाऱ्या झुनझुनवाला यांनी २०१७ मध्ये एकाच सेशनमध्ये तब्बल ८७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हर्षद मेहता प्रकरणात सेबीनं कारवाई केली. त्यावेळी झुनझुनवालादेखील सेबीच्या स्कॅनरखाली होते असं बोललं जातं.
२३ मार्चपासून झुनझुनवाला यांनी इस्कॉर्ट्स लिमिटेड नावाच्या एका कंपनीच्या माध्यमातून दर दिवसाला सरासरी तब्बल ५.५६ कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं दिलं. शेअर्सची किंमत कमी असताना ते विकत घ्यायचे. कमी कालावधीसाठी नुकसान होत असलं तरी भविष्यातील फायदा पाहायचा. दीर्घकालीन विचार करायचा, हे झुनझुनवाला यांचं तत्त्व आहे. त्यामुळेच झुनझुनवाला काय करतात हे पाहून शेअर विकायचे की खरेदी करायचे याचा निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.
हर्षद मेहता अडकला अन् झुनझुनवाला ठरले 'बिग बुल'; दिवसाची कमाई तब्बल ५.६ कोटी
Scam 1992 Harshad Mehta: भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातल्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदाराचा प्रवास
By कुणाल गवाणकर | Published: October 20, 2020 12:28 PM2020-10-20T12:28:41+5:302020-10-20T12:38:52+5:30