Join us  

Ratan Tata : दानशूर! त्सुनामी असो किंवा कोरोनाचा उद्रेक... प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 8:54 AM

Ratan Tata : रतन टाटा यांची गणना ही सर्वात यशस्वी उद्योगपतींच्या यादीत केली जाते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपली चमक दाखवली. 

उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा हे उदार व्यक्ती, लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान होते. रतन टाटा यांची गणना ही सर्वात यशस्वी उद्योगपतींच्या यादीत केली जाते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपली चमक दाखवली. 

त्सुनामी असो किंवा देशातील कोरोना महामारीचा उद्रेक असो, प्रत्येक संकटात मदत करण्यात रतन टाटा आघाडीवर होते. केवळ सामाजिक कार्यातच नव्हे तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यातही ते नेहमीच अग्रेसर असत. त्यांचा ट्रस्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतं. विद्यार्थ्यांना जे.एन. टाटा एंडोमेंट, सर रतन टाटा स्कॉलरशिप आणि टाटा स्कॉलरशिप द्वारे मदत दिली जाते.

रतन टाटा यांनी १९९१ मध्ये समूहाची कमान आपल्या हाती घेतली आणि २०१२ पर्यंत कंपनीचे चेअरमन होते. टाटा समूहाचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे आणि हे नाव घरातील स्वयंपाकघरापासून ते आकाशातल्या विमानांपर्यंत आहे. समूहात १०० हून अधिक लिस्टेड, अनलिस्टेड कंपन्या आहेत आणि त्यांची एकूण उलाढाल सुमारे ३०० अब्ज डॉलर आहे.  

रतन टाटा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याकडे अंदाजे ३८०० कोटींची संपत्ती आहे. २८ डिसेंबर १९३७ रोजी जन्मलेल्या रतन टाटा हे त्यांच्या सर्वांना मदत करण्याच्या स्वभावासाठी ओळखले जात होते. ते देशातील सर्वोच्च दानशूर लोकांपैकी होते, जे त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग टाटा ट्रस्टला दान करत असत. या देणग्या टाटा ट्रस्ट होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत कंपन्यांनी केलेल्या एकूण कमाईच्या ६६% योगदान देतात. 

टॅग्स :रतन टाटाटाटा